रेमडेसिवीरचा ४९ टक्केच पुरवठा

रेमडेसिवीरचा ४९ टक्केच पुरवठा
- Advertisement -


म. टा. वृत्तसेवा, ठाणे

करोना व्याधीत संजीवनीचे मोल प्राप्त झालेल्या रेमडेसिवीर या जीवनरक्षक इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी १५ दिवसांपूवी जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रण कक्ष स्थापन करून मागणी आणि पुरवठ्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असला तरी आतापर्यंत जेमतेम निम्म्या रुग्णांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन या व्यवस्थेमार्फत मिळू शकले आहे.

ठाणे जिल्ह्यात १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. सुरुवातीचे दोन दिवस नियंत्रण कक्षाकडेच इंजेक्शन आली नव्हती. नंतर मात्र पुरवठादारांकडून इंजेक्शन येऊ लागली. आतापर्यंत १६ ते ३० एप्रिल दरम्यान ३९ हजार ४६० इंजेक्शन उपलब्ध होऊन जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. याच काळात जिल्ह्याच्या विविध भागातील विविध रुग्णालयांमधून ७९ हजार ८१९ रेमडेसिवीरची मागणी नोंदविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या गोषवाऱ्यात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे गरजेच्या जेमतेम ४९ टक्के इंजेक्शनचा पुरवठा होऊ शकला. उर्वरित ५१ टक्के रुग्णांना एक तर त्यापासून वंचित रहावे लागले, अथवा त्यांच्या नातेवाईकांना काळ्या बाजारातून ते मिळवावे लागले.

१६ एप्रिल ते २८ एप्रिलच्या गोषवाऱ्यानुसार ठाणे ग्रामीण भागात २४४६ इंजेक्शनची मागणी होती. प्रत्यक्षात १११२ मिळाली. ठाणे महापालिका क्षेत्रात १३ हजार १९७ रेमडेसिवीर हवे होते, ७ हजार ३०३ मिळाले. भिवंडी महापालिका क्षेत्रातून ३४०३ रेमडेसिवीरची मागणी नोंदविण्यात आली, त्यांना १६६३ मिळाले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १२ हजार २७७ इंजेक्शन हवे होते, तिथे ६ हजार ११७ देण्यात आले. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातून २० हजार ७९७ ची मागणी नोंदविण्यात आली. तिथे १० हजार ३११चा पुरवठा करण्यात आला. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात ३ हजार ५६१ मागणी होती, तिथे १ हजार ८६३ मिळाले. मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रात ७ हजार १९६ रेमडेसिवीरची मागणी होती, तिथे ३ हजार ३१०चा पुरवठा झाला. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातून १ हजार ७७५ ची मागणी होती, तिथे ९४२ इंजेक्शन मिळाले. कुळगांव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रातून १८१० इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात आली. तिथे १ हजार ६० इंजेक्शन मिळाले. त्यानंतरच्या दोन तीन दिवसांतही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.



Source link

- Advertisement -