
नागपूर, दि. 18 :- सर्वसामान्यांच्या मनात एखादी प्रॉपर्टी, घर, फ्लॅट घेतांना अनेक प्रकाराच्या शंका असतात. या शंकांचे तेवढ्याच पारदर्शिपणे समाधान होणे आवश्यक असते. रियल ईस्टेट क्षेत्राला शासन पातळीवर पारदर्शिपणे सहकार्य व्हावे यादृष्टीने आपण अनेक बदल केले. ‘रेरा’ सारखा कायदा देशात आपण सर्वात अगोदर सुरू केला. सुमारे 50 हजार प्रकल्प रेरा अंतर्गत नोंदणी झाले हे आपल्या राज्याचे सर्वात मोठ यश आहे. संपूर्ण देशात नोंदणी झालेल्या प्रकल्पाएवढी ही संख्या आहे. यातून निर्माण झालेली विश्वासार्हता रियल ईस्टेट क्षेत्राला अत्यंत सहायभूत ठरली असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हॉटेल सेंटर पाँइट येथे नरडेकोच्या नूतन कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, विधानपरिषद सदस्य संदिप जोशी, ॲड अभिजित वंजारी, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रविण दटके, माजी खासदार कृपाल तुमाणे, नरडेको विदर्भचे नुतन अध्यक्ष डॉ. कुणाल पटोले, चेयरमन घनश्याम ढोमणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
नरडेको विदर्भ ही संस्था विकासकांच्या हितासमवेत ग्राहकांच्या हिताला अधिक जपणारी आहे. यात सर्वसामान्यांचे हित अधिक जपल्या जाते. शासनाच्या विविध धोरणांची नरडेको प्रामाणिकपणे अंमलबजावणी करते ही समाधानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशाच्या विकासाला रियल ईस्टेटने लावलेला हातभार अधिक महत्वाचा आहे. 65 टक्के जीडीपी शहरातून आहे हे लक्षात घेवून आम्हीही या क्षेत्रात अधिक पारदर्शकता यावी यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. आता कोणत्याही रियल ईस्टेट उद्योजकाने आपले प्रपोजल एखाद्या कार्यालयात दाखल केले तर त्याला मंजूरीच्या प्रक्रियेत कोणत्या टेबलवर किती वेळ लागतो याची माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
00000