Home ताज्या बातम्या रेल्वेत पत्नीला बसायला जागा मागणं बेतले जीवावर, अंत्यविधीला जाताना घडली घटना

रेल्वेत पत्नीला बसायला जागा मागणं बेतले जीवावर, अंत्यविधीला जाताना घडली घटना

0

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन ते घोरपडी दरम्यान रेल्वे प्रवासात मुंबई-लातूर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी केलेल्या बेदम मारहाणीत सोलापूर येथील सागर जनार्दन मारकड या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. दौंड रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी १२ जणांना ताब्यात घेतले आहे. दौंड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. सागर मारकड हे आपल्या आई, पत्नी व लहान मुलीसमवेत आज एका नातलगाच्या अंत्यविधीसाठी पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबई-लातूर-बिदर सुपरफास्ट एक्सप्रेसने कुर्डुवाडी कडे जात असताना. मध्यरात्री पावणे एक वाजता गाडीने पुणे रेल्वे स्थानक सोडताच सर्वसाधारण डब्ब्यात गर्दी असल्याने सागर याने दरवाजा लगतच्या ठिकाणी बसण्यासाठी जागा पकडली. याचवेळी बाकड्यावरील महिलेस पत्नीला बसण्यासाठी जागा देण्याची त्याने विनंती केली. परंतु, सागरने जागा मागताच महिलेने जागा देणे दुरच राहीले ऊलट सागर यास तिने शिवीगाळ केली. सागर व सागरच्या पत्नीने जागा देऊ नका परंतू शिवीगाळ करू नका असे सांगताच महिलेसमवेत असलेल्या अन्य महिला व पुरूषांनी सागरला काठीसह हात व पायांनी बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे सागर बेशुध्द होऊन पडला होता. सागरच्या पत्नीने तीन वेळा रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली. परंतु रेल्वे गाडी थांबून पुन्हा सुरू झाली. याच दरम्यान एका प्रवाशाने पोलीस नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला. तो पर्यंत सागर हा मृत्युच्या दाढेत पोहचला होता.

या घटनेची खबर मिळताच दौंड रेल्वे पोलिसांनी पहाटे सव्वादोन वाजता एक्सप्रेस गाडी दौंड रेल्वे स्टेशनवर पोहचताच. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे दोन जवान यांच्या मदतीने मारहाण करणा-यांना ताब्यात घेतले. दौंड पोलिसांनी सागर यास खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याने या जगाचा निरोप घेतला असल्याचे डॅाक्टरांनी घोषीत केले. सागरच्या पत्नी ज्योतीने या प्रकरणी दौंड रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडल्याने तो पुढील तपासासाठी पुणे रेल्वे पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात पोलीस तपास करतील कदाचित सागरच्या मारेक-यांना शिक्षा होईल. परंतु, आपल्याला बसायला जागा मिळावी यासाठी आपला पतीला जीव गमवावा लागला हे दुख:मात्र सागरच्या पत्नीची पाठ सोडणार नाही.