
सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक प्रकल्प राबवू. जतला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी व जतवासियांना लखपती करण्यासाठी अधिकारी व नागरिकांनी रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे राबवावीत. त्यासाठी वेगवेगळ्या खात्याअंतर्गत अधिकाधिक आवश्यक निधी देण्याची ग्वाही रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज दिली.
जत येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)च्या सहाय्याने हरित महाराष्ट्र व सुविधा संपन्न कुटुंब कार्यक्रमाची अंमलबजावणी व याकरिता करावयाच्या उपाययोजना याबाबत आयोजित सरपंच मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तहसील कार्यालय प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, मिशन मनरेगाचे महासंचालक श्री. नंदकुमार, जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपवनसंरक्षक नीता कट्टे, मनरेगाचे राज्य गुण नियंत्रक राजेंद्र शहाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे आदि उपस्थित होते.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जतच्या विकासासाठी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगून रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले, या माध्यमातून शक्य तितक्या अटी शर्ती शिथिल करण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त प्रोत्साहनपर कामे करण्यासाठी तसेच बांबू लागवडीसाठी आवश्यक सर्व सहकार्य करू. रोजगार हमी योजनेतून अनेक योजना आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जतच्या विकासासाठी या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. त्यासाठी लागणारे सहकार्य शासनाच्या माध्यमातून करू. संघटितपणे सर्वांसाठी विकासकामांची आखणी करा व यशस्वी करा. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. तसेच, गावातील, शेतजमिनीचे रस्ते विविध लेखाशीर्षांमधून पूर्ण करण्यात येतील. रोजगार हमी योजनेची स्थगित कामे पुन्हा सुरू करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.
पर्जन्यमान, जलसंधारणासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तुंची माहिती दिली. ते म्हणाले, देशात फक्त महाराष्ट्रात बांबू लागवडीसाठी अनुदान दिले जाते. तसेच, 100 दिवसांची मजुरीही दिली जाईल. कमी पाणी व कष्टात बांबू लागवड करता येते. एक एकर बांबू लागवडीतून वर्षाला एक लाख रूपये मिळू शकतात. जागतिक बँकेकडून भविष्यात मित्रा संस्थेला मिळणाऱ्या निधीतील अधिकाधिक निधी जतच्या विकासासाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, बंगळुरू विमानतळावर बांबूचा वापर केला आहे. लोकसभेत 5.5 लाख चौरस फूट फरशी बांबूची आहे, असे दाखले देऊन श्री. पटेल यांनी हरित महाराष्ट्र संकल्पना जत तालुक्यात यशस्वी करा. पर्यावरण बदलाची चाहूल ओळखून भावी वाटचाल करावी, असे आवाहन केले.
मिशन मनरेगाचे महासंचालक श्री. नंदकुमार म्हणाले, रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवल्यास ऊसतोड कामगारांसह सर्वांचे जीवन बदलेल. नागरिकांनी मनरेगाकडे लखपती व्हायचा मार्ग म्हणून पाहावे. रोजगार हमी योजनेतून 266 प्रकारची कामे आहेत. ती निकषांनुसार पूर्ण करा. विकासाची दृष्टी ठेवून, अभ्यास करून कामांचे नियोजन करावे. तुती लागवड, फळबाग लागवड अशा विविध मार्गांनी कामे करण्याचा विचार करा. यामध्ये युवकांचा सहभाग वाढवावा, असे ते म्हणाले.
माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, जत सांगली जिल्ह्याचा शेवटचे टोक असून, जत तालुक्यातील जनता कष्टाळू आहे. जतच्या विकासासाठी संघटितपणे काम करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दुष्काळी जिल्ह्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने जलसंधारण कामांसाठी भरीव निधी दिला आहे, असे सांगून आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, जत तालुक्यात गट तट बाजूला ठेवून रोजगार हमी योजनेची कामे यशस्वी करा. तालुक्यातील प्रत्येक माणूस रोजगार हमी योजनेतून लखपती व्हावा. अधिकाऱ्यांनीही त्यासाठी सहकार्य करून योजना यशस्वी करावी, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात गट विकास अधिकारी आनंदा लोकरे यांनी मनरेगाअंतर्गत जत तालुक्यात करण्यात येणाऱ्या विविध कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राणवायू रथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बसमध्ये बांबू लागवड वस्तू व स्क्रीन आहे. त्यातून बांबू लागवडीची माहिती दिली जाणार आहे. यावेळी जतच्या विकासात्मक कामाबाबत लघुचित्रफीत दाखवण्यात आली. सरपंच संघटना व रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून मंत्री भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला. अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित होते.
00000