रोहयो मंत्री भरत गोगावले यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांत विशेष मुलाखत – महासंवाद

    - Advertisement -

    • जलसंधारण आणि शाश्वत ग्रामविकासाला मिळणार चालना

    मुंबई, दि. १८ : ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराची शाश्वती, आर्थिक स्थैर्य आणि गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने ‘विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ अर्थात ‘व्हीबी-जी राम जी’ हा महत्वपूर्ण कायदा आणला. या कायद्यांतर्गत ग्रामीण कुटुंबांना वर्षाकाठी १२५ दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे. या नव्या कायद्याची उद्दिष्टे, महत्वपूर्ण तरतुदी, ग्रामीण जनतेला होणारे लाभ आणि महाराष्ट्रातील अंमलबजावणीचे नियोजन याविषयी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमांत विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, २१ , सोमवार, २३ आणि मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन  डॉ. मृण्मयी भजक यांनी केले आहे.

    महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :

    ट्विटर (X) : MahaDGIPR

    फेसबुक : MahaDGIPR

    यूट्यूब : MaharashtraDGIPR

    ग्रामीण रोजगारनिर्मितीबरोबरच जलसंधारण, सिंचन सुविधा, शेततळी, भूजल पुनर्भरण आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यासारख्या शाश्वत विकासकामांना प्राधान्य देण्याची आवश्यकता या मुलाखतीत अधोरेखित करण्यात आली आहे. विशेषतः दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागात रोजगार हमीच्या माध्यमातून कायमस्वरूपी विकासकामे उभारणे, गावांची जलसुरक्षा वाढविणे आणि शेतीला पूरक सुविधा निर्माण करणे याबाबत शासनाच्या नियोजनाची माहिती रोहयो मंत्री गोगावले यांनी दिली आहे.

    रोजगाराच्या संधी आणि ग्रामीण विकासकामांची सांगड घालून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे, शेतकरी व शेतमजुरांचे हित जपणे, फलोत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि आत्मनिर्भर गावांची निर्मिती करणे या विषयांवरही मुलाखतीत प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पना साकार करण्यासाठी रोजगारनिर्मिती, जलसुरक्षा आणि शाश्वत ग्रामविकास यांचे महत्व या संवादातून स्पष्ट झाले आहे.

    ००००

    जयश्री कोल्हे/स.सं.

     

     

     

     

     

    - Advertisement -