रायगड जिमाका दि. २५ : रोहा रेल्वे स्थानकावर जलद व अतिजलद दहा गाड्यांना थांबा देण्याचा शुभारंभ महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.
रोहा येथे कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस, कोयंबटुर हिसार एक्स्प्रेस, कोचुवेली चंढीगड एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगांव एक्स्प्रेस या दहा जलद व अतिजलद गाड्या थांबणार आहेत. यावेळी जलद गाडीतून प्रवास करणार्या पहिल्या प्रवाशाला खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते तिकीट देऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता वाय. पी. सिंग, एडीआरएन श्री शशीभूषण, एसीएम राजीव रंजन, आदी उपस्थित होते.
रोहा येथे जलद व अतिजलद गाड्यांना थांबा मिळावा ही गेल्या कित्येक वर्षांपासून रोहावासियांची मागणी होती.
रोहा स्थानकावर अतिजलद दहा गाड्यांना थांबे रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाले आहेत आणि आज त्याची सुरूवात होत आहेत हा आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस आहे.लवकरच २० कोटी रुपये खर्च करून रोहा रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण होणार आहे.याठिकाणी विविध सुविधा उपलब्ध होत आहेत, असे महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
जनतेची कामे करताना संवेदनशील रहावे लागते. कामाची तत्परता असावी लागते आणि याच भावनेने रोहेकरांचे कित्येक वर्षाचे स्वप्न पूर्ण करत असल्याचा आनंद आहे असे खासदार श्री. तटकरे यांनी सांगितले. दूरपल्ल्याच्या गाड्या रोहा येथे थांबाव्यात यासाठी प्रयत्न होता. ते आज पूर्ण होत आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री यांचे विशेष आभार त्यांनी यावेळी मानले. रोहा रेल्वे स्थानकावर अतिजलद गाड्यांना थांबा मिळाल्यानंतर माणगाव, रोहा, कोलाड, पेण येथील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्या गाड्या इथे थांबणार आहेत. अजून नवीन थांबे कसे मिळतील यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील असे आश्वासनही खा. तटकरे यांनी दिले.
०००