पुणे : परवेज शेख
पुणे – लग्नास नकार दिला म्हणून तरुणीचे अपहरण करून तिच्यावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री आठ वाजता मुंढवा येथील उड्डाण पुलाखाली घडला. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख (दोघे रा. रामटेकडी) व चंदन चव्हांडके (रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी सोनवणे या दोघांचे सात ते आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
मात्र, काही कारणांमुळे त्यांचे प्रेमसंबंध तुटले. सोनवणे फिर्यादीस सातत्याने फोन करून त्रास देत होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सात वाजता सोनवणे याने नदीम व चंदन यांच्या मदतीने फिर्यादीस मुंढवा येथे रिक्षामध्ये जबरदस्तीने बसविले. तिला हडपसरमधील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात नेले.
तेथे सोनवणेने फिर्यादीला लग्नाची मागणी घातली. फिर्यादीने त्याला नकार दिला. त्यामुळे सोनवणेने शिवीगाळ करीत चाकूने फिर्यादीवर वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाली.