मुंबई, दि.30 :राज्यामध्ये आतापर्यंत 31 जिल्ह्यांमधील एकूण 2 हजार 83 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादूर्भाव दिसून आला आहे. या गावांतील एकूण 39 हजार 341 बाधित पशुधनापैकी एकूण 18 हजार 381 पशुधन उपचाराने बरे झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
लम्पी बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एकूण 106.62 लाख लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या 5 किमी परिघातील 2083 गावातील 49.69 लाख पशुधन आणि परिघाबाहेरील 44.13 लाख पशुधन अशा एकूण 93.82 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी लस देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यात जळगाव आणि अकोला या सर्वांत जास्त बाधित जिल्ह्यांमध्ये लसीकरण पूर्ण झाले असून इतर जिल्ह्यातील बहुतांश पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रातील लसीकरण अंतिम टप्प्यात आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एक कोटी – सुमारे 70 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे श्री सिंह यांनी सांगितले.
0000
राजू धोत्रे/विसंअ/30.9.2022