१६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वयोगटावरील अशा एकूण १२ लाख ९९ हजार ४४८ लोकांना लसीकरणाचा डोस देण्यात आला आहे. १ एप्रिल आणि १ मे पासून सुरू झालेल्या ४५ वयोगटावरील आणि १८ वयोगटावरील मोहिमेनंतर लसीकरणाचा साठा नसल्यामुळे लसीकरणाची मोहीम रेंगाळली आहे.
सुरुवातील ६० वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरू झाले त्यांना पहिला डोस दिला. त्यानंतर दुसरा डोस सुरू होताच ४५ वयोगटावरील नागरिकांना लस देण्यास सुरूवात केली. लशीचा साठा नसतानाही आता १ मे पासून १८ वयोगटावरील लोकांसाठी लस सुरू केल्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वयोगटावरील नागरिकांना दुसरा डोस मिळविण्यासाठी ठिकठिकाणी केंद्रावर वणवण करावी लागत आहे.
ग्रामीण परिसरात कोविशिल्डचे १५०० आणि कोवॅक्सिनचे २००१ डोस उपलब्ध असल्यामुळे त्या त्या तालुक्यात एखाद-दुसरे केंद्र सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खासगी मिळून १३९लसीकरण केंद्रे आहेत. यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच केंद्रे सुरू आहेत.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ठाण्यातील नगरसेवक तसेच वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने ठिकठिकाणी लसीकरणाची मोहीम राबवित वोट बँक कॅच करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नगरसेवक किंवा पक्षाच्या वतीने त्या-त्या परिसरात केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नोंदणी अनिवार्य
शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी नोंदणी अनिवार्य असून नोंदणी झाल्यानंतर संबंधित लसीकरण केंद्राने दिलेल्या स्लॉटमध्ये असणाऱ्या व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे. या वयोगटातील नागरिकांसाठी वेगळा साठा दिला जाणार असून तो याच वयोगटासाठी वापरला जाणार आहे, असे सांगण्यात आले आहे. तर इतर गटातील नागरिकांना शासनाच्या सुचेनानुसार उलपब्ध होणाऱ्या लशीतून पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे