Home ताज्या बातम्या लशीनंतर करोना संसर्ग कमी; तरीही हे नियम पाळाच

लशीनंतर करोना संसर्ग कमी; तरीही हे नियम पाळाच

0
लशीनंतर करोना संसर्ग कमी; तरीही हे नियम पाळाच

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : लसीकरणामुळे करोना प्रतिबंधासाठी मदत होते का, असा प्रश्न काही जणांच्या मनात सातत्याने उपस्थित होतो. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये २६ जणांना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर करोनाचा संसर्ग झाला. तर पहिला डोस घेतल्यानंतर १० हजार ५०० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर करोनाचा सौम्य स्वरूपाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लसीकरण करून घेणे महत्त्वाचे असल्याचे सिद्ध झाले आहे.

पालिकेने करोना प्रतिबंधासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना केल्या आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. २६ जूनपर्यंत मुंबईमध्ये कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचे एकूण ५० लाख ९३ हजार ४८५ डोस देण्यात आले. यात पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ४१ लाख ७ हजार ५१४ इतकी तर दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ९ लाख ८५ हजार ९७१ इतकी आहे. राज्यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे असले तरीही अद्याप दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले नाही. देशातील ज्या राज्यामध्ये हे प्रमाण समाधानकारक आहे, तिथे करोना संसर्गही नियंत्रणात येण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे लसीकरणाच्या मोहिमेला वेग देण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयामध्ये करण्यात आलेल्या अशाच प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये एक टक्के व्यक्तींना संसर्गासाठी आयसीयूची गरज लागली होती. तर अन्य रुग्णांमध्ये संसर्गाचे प्रमाण अत्यल्प होते. सौम्य लक्षणे असल्याने हे आरोग्यकर्मचारी अधिक जलदगतीने करोनामुक्त झाले होते.

…तरीही नियम पाळा

लस घेतल्यानंतर मास्क लावण्याची गरज नाही, या भ्रमात राहून अनेक जण मास्क लावत नाहीत. मात्र लस घेतल्यानंतरही मास्क लावणे गरजेचे आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. लस घेतल्यानंतर संसर्ग होण्याची शक्यता कमी होत असली, तरीही ती पूर्णपणे नष्ट होत नाही. त्यामुळे लसीकरणानंतरही नियम पाळणे गरजेचे आहे.

पहिल्या डोसनंतर संसर्ग : १० हजार ५०० रुग्ण

दुसऱ्या डोसनंतर संसर्ग : २६ रुग्ण

२६ जूनपर्यंतचे एकूण लसीकरण

एकूण डोस : ५० लाख ९३ हजार ४८५

पहिला डोस : ४१ लाख ७ हजार ५१४

दुसरा डोस : ९ लाख ८५ हजार ९७१

Source link