
लातूर, दि. १९ : राज्याचे माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पमध्ये ही बैठक झाली.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील दुष्काळाची सद्यस्थिती, पाणीटंचाई निवारण, चारा नियोजन, पीक नुकसान भरपाई आदी बाबींच्या माहितीचे यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील ऋतुचक्र लक्षात घेवून जिल्ह्यात भूजल पुनर्भरणासाठी मोहीम स्वरूपात रिचार्ज शाफ्टसारखी कामे हाती घेण्यासाठी प्रयत्न करावेत. यासोबतच पीक पद्धतीतही अनुरूप बदलासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. कमी सिंचन सुविधेत घेता येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी यावेळी दिल्या.
लातूर जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ५१.२ टक्के पाऊस झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे भूजल पातळी खालावली आहे. जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांमध्ये केवळ १०.१० टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक असून हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लातूर शहर व ग्रामीण भागात सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून विविध सवलती लागू केल्या असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले. तसेच चारा टंचाई निवारण, मायक्रो फायनान्सच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत ५७,१११ शेतकऱ्यांना ४४३.५८ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. अवैध सावकारीविरोधात विशेष मोहीम राबवून १४ गुन्हे दाखल केले आहेत, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत सादरीकरण करताना सांगण्यात आले की, खरीप हंगामात अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६ लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे ५.५२ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी सुमारे ५२८.९९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना दिवाळी सणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रिम मदत वितरण करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘पोलीस आपल्या गावामध्ये‘ या विशेष उपक्रमाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी माहिती दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, संभाव्य सामाजिक व आर्थिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर चर्चा केली जात आहे. आतापर्यंत पोलिसांनी ५७९ गावांना भेटी देवून २७ हजार ८३७ नागरिकांशी संवाद साधला असल्याचे त्यांनी सांगितले.
सीमा सुरक्षा दलाच्यावतीनेही चाकूर येथील कॅम्पद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
०००००

WhatsApp