लिफ्ट कंपनीच्या संचालकाची ‘गूढ’ आत्महत्या, पोलीस बुचकळ्यात

- Advertisement -

फरीदाबाद:  एका लिफ्ट कंपनीचे संचालक विनीत यांनी काही दिवसांपूर्वी राहत्या घरातच आत्महत्या केली. पण त्यांनी आत्महत्येसाठी प्रिंटेड पत्र लिहिलं, गॅस सिलिंडर आणि गॅस मास्कचा वापर केला आणि घरातील तीन सदस्यांना या साऱ्या प्रकाराची तसूभरही कल्पनाही नव्हती. या सर्व गोष्टींमुळे पोलीस विनीत यांच्या ‘गूढ आत्महत्येमुळे बुचकळ्यात पडले आहे. 

सोमवारी मध्यरात्री हरेकृष्णा अपार्टमेंटमधील आपल्या राहत्या घरात विनीत यांनी आत्महत्या केली. विनीत यांनी आत्महत्या केली तेव्हा घरात त्यांची पत्नी आणि दोन मुलं उपस्थित होते. त्यांची पत्नी आणि मुलगी एका खोलीत तर मुलगा दुसऱ्या खोलीत झोपला होता. विनीत मात्र आपल्या खोलीत एकटेच होते. सिलिंडरला नळी जोडून सिलिंडर मास्क तोंडाला लावून विनीत यांनी आत्महत्या केली होती. पण हे सिलिंडर विनीत यांनी कुठे लपवून ठेवले होते हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. तसंच त्या सिलिंडरमध्ये कोणता गॅस होता हेही अजून स्पष्ट झालेलं नाही. विनीत यांच्या खोली समोरच्या भिंतीवर प्रिंटेड सुसाइड नोट चिटकवली होती. ही सुसाइड नोट काही दिवसांपूर्वीच प्रिंट केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तसंच आपल्या मृत्यूसाठी विनीत यांनी कोणालाच जबाबदार धरलेलं नाही. या नोटवर आत्महत्येची वेळही लिहिलेली आहे. 

मध्यरात्री जेव्हा विनीत यांच्या पत्नीला जाग आली तेव्हा गॅस मास्क तोंडाला लावलेल्या अवस्थेत विनीत आढळले. विनीत यांना लगेच जवळच्या रुग्णालयात हलवले गेले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सिलिंडर, सिलिंडर मास्कची व्यवस्था विनीत यांनी कुठून केली? इतक्या सगळ्या गोष्टींची रात्री ने- आण विनीत करत होते तेव्हा घरातील कोणालाच जाग कशी आली नाही? ही आत्महत्येची नोट त्यांनी कुठे छापली अशा असंख्य प्रश्नांमुळे पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. तसंच ही आत्महत्या आहे की हत्या याचाही शोध घेतला जातो आहे. 

- Advertisement -