
मुंबई, दि. ३१: लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी आता अर्जदारांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. शासकीय योजनांच्या प्रक्रिया पुनर्रचने अंतर्गत कागदपत्रांची संख्या कमी करून अर्ज नोंदणी ते अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकाद्वारे दिली.
शासनाच्या विविध योजनांच्या सुसूत्रीकरणाबाबतच्या सूचनांच्या अनुषंगाने लेक लाडकी योजनेच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. यासाठी नवीन शासकीय प्रक्रियांची पुनर्रचना (जीपीआर) तयार करण्यात आली असून, त्याअंतर्गत अर्जदारांना स्वतः ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज नोंदणी, छाननी, अर्ज मंजुरी आणि लाभ मंजुरी या प्रक्रियांमध्ये सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सादर करावयाच्या कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
या नवीन व्यवस्थेमुळे विशेषतः ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र कार्यान्वित नाहीत, अशा भागांतील लाभार्थ्यांना अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. राज्यातील कोणत्याही क्षेत्रातील रहिवाशांना आता या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. याशिवाय, अर्जदारांना त्यांनी सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आता अर्ज प्रक्रिया देखील ऑनलाइन करण्यात आल्याने योजनेच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आजपर्यंत या योजनेअंतर्गत पहिला लाभ प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २,९८,६९५ इतकी आहे.
००००

WhatsApp