Home पोलीस घडामोडी लेडिज बारमध्ये पैसे उधळणे आले अंगलट, कंपन्यांमध्ये चोरी करणारे जेरबंद

लेडिज बारमध्ये पैसे उधळणे आले अंगलट, कंपन्यांमध्ये चोरी करणारे जेरबंद

डोंबिवली : शहरातील एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये चोरलेल्या वस्तू विकल्यानंतर येणारा पैसा लेडिज बारमध्ये खर्च करणाऱ्या रियाज रमजान खानसह त्याच्या दोन साथीदारांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांतील आठ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे उपस्थित होते.

पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. या कंपन्यांमधील कपड्यांचे गठ्ठे, फिल्टर प्लांट, इलेक्ट्रिक मोटार आदी माल चोरट्यांनी चोरला होता. या प्रकरणाचा तपास मानपाडा पोलीस करत होते. यावेळी सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवायला पोलिसांनी सुरुवात केली. याच दरम्यान, लेडिज बारमध्ये पैसे खर्च करणाºया रियाज याच्यावर पोलिसांना संशय आला. त्याच्या हालचालींवर पाळत ठेवणाºया पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी रफिक करम शेख, प्रकाश विठ्ठल सूर्यवंशी तसेच अन्य दोन साथीदारांच्या मदतीने सहा गोदामे फोडून त्यातील ११ लाख रुपयांच्या मालाची चोरी केल्याची कबुली रियाजने पोलिसांना दिली. त्यानंतर, पोलिसांनी शेख व सूर्यवंशीला अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस निरीक्षक बाबासाहेब तांबे, नासीर कुलकर्णी (प्रशासन), पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे आदींनी ही कारवाई केली.

सोनसाखळीचोरास बेड्या, मंगळसूत्र जप्त
पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून दुचाकीवरून पोबारा करणारा सुरज पलानी सामी यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.