लॉकडाऊनमध्येही ५० कुटुंबांना मिळाला रोजगार ,

- Advertisement -

औरंगाबाद :शहरातील सर्व दुकाने लॉकडाऊनमुळे बंद आहेत. मात्र पोलिसांच्या सहकार्यामुळे ५० गरीब कुटुंबांना राेजगार मिळाला आहे. कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेल्या महिला सध्या घरबसल्या कापडी मास्क बनवण्याचे काम करत आहेत. त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळाले आहे; शिवाय या कुटुंबांना लॉकडाऊन संपेपर्यंत रोज दोन वेळा फूड पॅकेट; शिवाय रेशन किट दिले जाते.

ल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कम्युनिटी पोलिसिंग या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील तरुणांना इंडो जर्मन व विविध औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला जातो. तर महिलांना कापडी आणि कागदाच्या पिशव्या बनवणे, शिलाई काम याचे प्रशिक्षण देऊन घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच माध्यमातून नागपूरचे उद्योजक प्रमोद मानमोडे यांनी या महिलांना कपडे शिवण्याचे कंत्राट दिले होते. त्यासाठी कपडा व इतर साहित्यदेखील पाठवले होते. मात्र लॉकडाऊनमुळे ही ऑर्डर रद्द झाली.

ही माहिती या उपक्रमाचे समन्वयक डॉ. किशोर उढाण यांना कळताच त्यांनी या महिलांना मास्क बनवण्याचे कंत्राट मिळवून दिले. एक मास्क शिवण्यासाठी एका महिलेला दोन रुपये मिळतात. एक महिला किमान १०० मास्क रोज शिवते. शिवाय कपडा कटिंग व मशीन मेंटेनन्स यांनादेखील रोजगार मिळाला आहे. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.

 मास्कचे मोफत वाटप

कपडा कटिंग आणि शिवणकाम मिळून एक मास्क ४ रुपये ७० पैशांमध्ये तयार होतो. तयार झालेले मास्क शहरातील गरीब वस्त्यांमध्ये मोफत वाटले जातात. विशेष म्हणजे हे मास्क पुन्हा धुऊन, सॅनिटाइझ करून वापरता येतात. शहरातील ज्या स्वयंसेवी संस्था, ग्राहकांना हे मास्क हवे आहेत त्यांना हे उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती डॉ. किशोर उढाण यांनी दिली. सध्या हा उपक्रम सातारा, बुढीलेन, अशोकनगर, शताब्दीनगर, इंदिरानगर या भागात सुरू आहे.

- Advertisement -