Home ताज्या बातम्या ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेली ‘आनंदी’ सुखरूप घरी

‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेली ‘आनंदी’ सुखरूप घरी

चऱ्होली: पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदी लागू असल्यामुळे रस्त्यावर सर्व वाहतूक बंद आहे. हे माहिती असताना सुद्धा पोटच्या जीवासाठी परिस्थितीची कुठलीही तमा न बाळगता ससून रुग्णालय गाठणारी महिला ‘लॉकडाऊन’च्या कचाट्यात सापडली. अशा संकटसमयी मदतीला धावून आलेले पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाच्या भोसरी डेपोतील कर्मचारी एका आईसाठी देवदूत ठरले. या कर्मचाऱ्यांनी माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आणून दिला आहे.

चाकण येथे नाणेकरवाडीत राहणाऱ्या अर्चना राहुल नवगिरे ही महिला पाच महिन्याच्या आनंदी नावाच्या आजारी मुलीला घेऊन ससून रुग्णालयात गेली होती. उपचार झाल्यानंतर परत येताना ही महिला भोसरीपर्यंत बस मिळाल्याने भोसरीतील उड्‌डाणपुलाखालील बस टर्मिनलजवळ उतरली. मात्र भोसरीमधून चाकणला जाणारी बस नसल्याने ही महिला आपल्या चिमुरडीसह लॉकडाउनमुळे संकटात सापडली. मुलगी आजारी व या प्रवासात मुलीला भूक लागल्यामुळे भर रस्त्यावर उन्हात बसलेल्या आईला दूध पाजायला अडचण झाली होती.

भुकेच्या आकांताने रडणार छोटंसं बाळ व त्याची ही अवस्था पाहून डोळे पाणावलेली आई हे दृश्‍य पाहून शेवटी नियतीलाच दखल घ्यावी लागली. भर उन्हात बसलेली महिला व बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून भोसरी बस टर्मिनल येथे कामावर असलेले काळुराम लांडगे व विजय आसादे यांनी त्वरित या महिलेला ‘कंट्रोल रूम’मध्ये आणून बाळाला दूध देण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली. अडचणीत सापडलेल्या महिलेला पाणी व जेवणाची सोय करण्यात आली. या दोघांना चाकण येथे घरी सुखरूप पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली. बाळाची भूक झाल्याने बाळाला शांत झोप लागली. अडचणीत मदत मिळाल्याने एका आईची घरी जाण्याची काळजी मिटली होती.

चाकण येथे माझे पती सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांना सुट्टी मिळत नसल्याने व चाकण परिसरात खासगी दवाखाने बंद असल्यामुळे मी आनंदी हिचा जन्म झालेले ससून रुग्णालय गाठायचे ठरविले. चाकणवरून मला थेट ससूनपर्यंत बस मिळाली, तेव्हा सुद्धा ‘पीएमपी’च्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. भोसरी येथे आल्यानंतर माझ्यापुढे जे संकट उभे राहिले होते. तेव्हा मला बहीण माणून काळुराम लांडगे व विजय आसादे या कर्मचारी बांधवांनी माझी व माझ्या बाळाची खूप काळजी घेतली. व मला सुखरूप घरी पोहचविण्याची व्यवस्था केली. त्यामुळे नातं फक्‍त रक्‍ताचीच असू शकतात, हा समज यांनी खोटा ठरविला.