Home शहरे उस्मानाबाद लॉकडाऊन उल्लंघन : बेंबळीतील लोकांना केला बीडीओंनी दंड

लॉकडाऊन उल्लंघन : बेंबळीतील लोकांना केला बीडीओंनी दंड

0

उस्मानाबाद । २८ जुलै : तालुक्यातील बेंबळी येथे अचानक भेट देऊन जवळपास दोन डझन लोकांना गट विकास अधिकारी समृद्धी दिवाने यांनी दंडाची शिक्षा केली. मंगळवारी २८ जुलै रोजी दुपारी अचानक बीडीओ आपल्या ताफ्यासह बेंबळीत दाखल झाल्या आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या लोकां विरुद्ध त्यांनी दंडात्मक कारवाई केली. यामुळे लोकांमध्ये जरब निर्माण झाली आहे.

मागील आठवड्यात येथील एक जण कोरोना बाधित आढळल्याने डोने गल्ली आणि मोटे गल्ली हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सीमा बंद केल्या आहेत. तरीही लोक ‘लॉकडाऊन’चे उल्लंघन करत आहेत. म्हणून आशा लोकांविरुद्ध बिडीओनी दंडात्मक कारवाई केली.  या वेळी सरपंच सत्तार शेख, ग्रामसेवक एम. बी. करपे, पोलीस कर्मचारी रविकांत जगताप आणि अन्य उपस्थित होते.

दरम्यान ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी मिळून जवळपास सात हजार रुपये दंडाची रक्कम वसूल केली आहे. ग्रामपंचायतीने शहा ऑटोमोबाईल, मॉडर्न टेलर, सौदागर हार्डवेअर, न्यू मॉडर्न टेलर, वैभव किराणा, रहीम खालीक पठाण या दुकानदारांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला आहे. उर्वरीत सहा लोकांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड करण्यात आला. असे पंचायत प्रशासनाने एकूण चार हजार दोनशे रुपये रोख वसूल केले आहेत. असे ग्रामविकास अधिकारी एम. बी. करपे यांनी सांगितले.

दरम्यान पोलिसांनीही सात लोकांना दोन हजार सहाशे रुपये दंड केला आहे. चार लोकांना पाचशे आणि तीन लोकांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड केल्याचे पोलीस कर्मचारी रविकांत जगताप यांनी सांगितले.

दरम्यान एका औषधी दुकानाविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्याच्या सूचना बिडीओनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना केल्या. संबंधित दुकान मालकाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरीही बीडीओ प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गुन्हा नोंदविण्यावर ठाम होत्या. मात्र या प्रकरणात पुढील कारवाई झाली की नाही हे समजू शकले नाही.

दरम्यान नागरिकांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने दिलेल्या सर्व दिशानिर्देशांचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, स्वच्छता राखावी, ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन बीडीओ समृद्धी दिवाने यांनी यावेळी केले.