Home ताज्या बातम्या “लॉकडाऊन” काळात शिल्लक पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप

“लॉकडाऊन” काळात शिल्लक पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप

उस्मानाबाद । प्रतिनिधी । दिनांक ३ एप्रिल : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बऱ्याच दिवसापासून बंद आहेत. आणि पुढेही बंद राहणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून दिले जाणारे अन्न धान्य शिल्लकच राहिले आहे. त्याचे वाटप बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथील चारही जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील दोनशे बहात्तर विद्यार्थिनींना गुरुवारी आणि शुक्रवारी (ता. २ व ३) तांदूळ आणि डाळीचे वाटप करण्यात आले. शुक्रवारी (ता. ३) प्राथमिक मराठी शाळेत दोनशे विद्यार्थ्यांपैकी जवळपास एकशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळ, मटकी आणि हरभऱ्याचे वाटप करण्यात आले. उर्दू प्राथमिक शाळेतील एकशे नऊ विद्यार्थ्यांपैकी शहाण्णव विद्यार्थ्यांनाही बुधवारी आणि गुरुवारी (ता. १ व २) तांदूळ, डाळ, मटकी आणि हरभऱ्याचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती अनुक्रमे राजेंद्र माने, हुग्गे आणि खमर सय्यद या शिक्षकांनी दिली आहे.

दरम्यान जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतही तांदूळ आणि डाळीचे वाटप करण्यात आले असल्याचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अहेमद दर्याजी यांनी सांगितले आहे. मात्र किती विद्यार्थ्यांना किती धान्य वाटप केले याची माहिती मिळू शकली नाही. या शाळेच्या मुख्याध्यापकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान प्राथमिक मराठी शाळेतील जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांनी पोषण आहार नेलेला नाही. त्यांना सोमवारी त्यांचा पोषण आहार वाटप करण्यात येईल असे या शाळेचे शिक्षक हुग्गे यांनी सांगितले.