मुंबई :- शफीक शेख
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे कधीही न थांबणारी मुंबई शांत झाली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मायानगरी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आज किंवा उद्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारने तशी केंद्र सरकारकडे मागणीही केली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी लोकल सुरू व्हावी, अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी लोकल सेवा कशी उपयुक्त आहे, याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकल सेवा सुरू करण्याबाबतची आपली भूमिका याआधीच केंद्र सरकारला कळवीली आहे. रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या याबाबत चर्चा सुरू असून लोकल सेवा सुरू केली तर ती कोणत्या स्वरूपात असावी याबाबतची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मुंबई लोकल पुन्हा सुरू झाल्यास अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.