Home ताज्या बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या वाहनांचे भाडे थकले; मालकांचे ठिय्या आंदोलन

लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या वाहनांचे भाडे थकले; मालकांचे ठिय्या आंदोलन

राहुरी:

लोकसभा निवडणुकीसाठी भाडे तत्वावरील वाहनांची ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राहुरी महसूल प्रशासनाच्या निषेधार्थ बुधवारी दुपारी राहुरी तहसीलदाराच्या कार्यालयात वाहन धारकांच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. वाहनधारकांचा आक्रमक पवित्रा पाहता संबंधितांना तातडीने वाहनभाडे अदा करण्याचे आदेश देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीस दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला असताना वाहनांच्या कामाचे पैसे देण्यास राहुरीच्या महसुल प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात होती.वाहनचालकांनी वाहनाचे भाडे घेण्यासाठी राहुरी तहसील कार्याल्यात अनेकदा हेलपाटे मारले.तहसील कार्याल्यातील अधिकारी पैसे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला होता.

वाहनाच्या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने आज बुधवारी वाहन चालक मालकांनी तहसील कार्याल्यात अधिकाऱ्यांना घेराव तसेच ठिय्या आंदोलन करून वाहनांच्या कामाचे पैसे मिळाल्या शिवाय उठणार नाही हा पविञा घेतल्याने अधिकाऱ्याने नरमाईचे धोरण स्विकारत वाहन धारकांना तातडीने पैसे अदा करण्याचे आदेश दिले. महसुल विभागाकडून निवडणुकी दरम्यान वाहने भाडेतत्वावर घेताना संबंधित वाहन चालकांच्या जेवणासह अन्य सुविधा निवडणूक यंत्रणेकडून देण्यात येत नसल्याची खंत यावेळी वाहन चालकांनी व्यक्त केली. या ठिय्या आंदोलनात ३० वाहन चालक मालक सहभागी झाले होते.

दरम्यानच्या काळात वाहनांच्या कामाचे पैसे धनादेशाद्वारे वाहन चालकाच्या खात्यावर अदा करण्यात आल्याची माहिती महसुल प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र धनादेश संबंधित वाहन मालकांकडे पोहोचले नसल्याने ही माहिती वाहनधारकांच्या दृष्टीने बनाव ठरली होती.