विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
मुंबई, दि. 26 : लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असे निर्देश दिले. मुख्यमंत्री आज मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.
राज्याची देशात एक चांगली प्रतिमा आहे. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच इतर केंद्रीय मंत्री देखील राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी नावीन्यपूर्ण योजना देखील आपण मांडल्या पाहिजेत. नवनवीन उपक्रमांचे स्वागत आहे. केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हे पाहून तात्काळ असे प्रस्ताव सादर करावेत . विशेषत: रेल्वे, महामार्ग याबाबतीत केंद्राकडील पाठपुरावा वाढवावा. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे अशी जनतेची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण करताना गतीमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शासन आणि प्रशासन ही राज्य कारभाराच्या रथाची दोन चाके आहेत. दोघांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांची प्रभावी अंमबजावणी करावी. राज्यातील नवीन सरकारकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकरी, कामगार, शेतमजूर, यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. सरकारची प्रतिमा ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. यासाठी सर्वांनी राज्याच्या हिताची कामे प्रभावीपणे करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांसाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्या निर्णयांची तत्काळ अंमलबजावणी करावी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यासाठी गती द्यावी. राज्यातील रस्त्यांची सुधारणा करताना नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोणत्याही कामामध्ये गुणवत्तेत तडजोड करु नका, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आवश्यक कामांना स्थगिती नाही
जनतेशी संबंधित आवश्यक अशा कामांना स्थगिती नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लवकरच 100 दिवसांचा कार्यक्रम
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, लवकरच 100 दिवसांचा कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. पूर्वी सुरु असलेली लोकहिताची कामे सुरु ठेवणार आहोत. प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी रिक्त पदांची भरती होणे पण गरजेचे आहे त्यादृष्टीने विभागांनी नियोजन तयार ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.
०००