वर्धा, दि. 13 (जिमाका) : समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकासाठी लोकसहभागातून सेवाकार्य निर्माण करणे आवश्यक आहे. सरकारलाही काम करताना मर्यादा असतात. अशावेळी सार्वजनिक खाजगी भागीदारीतून हे शक्य होते. गोरगरीबांची सेवा करण्याच्या दृष्टीने मेघे समूहाने आजतागायत केलेले कार्य ही मोठी देण आहे, असे गौरवोद्गार भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सावंगी येथे दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळ्यात काढले.
या लोकार्पण समारोहाच्या अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे कुलपती व रुग्णालय समूहाचे संस्थापक दत्ता मेघे होते. महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, खासदार रामदास तडस, आ. रणजित कांबळे, आ. समीर कुणावर, आ. दादाराव केचे, आ. डॉ. पंकज भोयर, धामणगावचे आमदार प्रताप अडसड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, विश्वस्त सागर मेघे, आ. समीर मेघे, प्रतिभा गुप्ता, राधिका गुप्ता, कुलगुरू डॉ. राजीव बोरले, प्रकुलगुरू डॉ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितीन भोला, मुख्य कार्यवाह अधिकारी डॉ.जॉर्ज फर्नांडिस, डॉ.श्वेता काळे पिसुळकर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी श्री.गडकरी यांच्या हस्ते कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील अद्यावत वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. उद्घाटनानंतर विद्यापीठ सभागृहात आयोजित समारोहात बोलताना श्री.गडकरी म्हणाले, आज विविध क्षेत्रातील संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. भविष्यकाळाची ती गरज आहे. नवसंशोधनाची व नवनिर्मितीची भारतीय तरुणांमध्ये क्षमता आहे. कोरोनासंदर्भात मेघे अभिमत विद्यापीठाने केलेले संशोधनकार्य उल्लेखनीय आहे. त्यासोबतच, या कोरोना काळात सावंगी रुग्णालयाने असंख्य लोकांचे प्राण वाचविले. आपले हे योगदान समाज कधीही विसरू शकणार नाही. आजच्या काळात मुलांना आईवडिलांचा विसर पडतो, अशावेळी दिवंगत मित्राचे नाव प्रेमापोटी एका मोठ्या रुग्णालयाला दिले जाते, हे सामाजिक संस्कार आहेत, असे उद्गार ना. गडकरी यांनी काढले.
आरोग्यविज्ञानातही भारत अग्रेसर – श्री.केदार
पंच्याहत्तर वर्षांपूर्वी भारताची लोकसंख्या ३६ कोटी होती, ती आज १३० कोटीच्या घरात आहे. कोरोना महामारीत प्रगत देशही हतबल झाले असताना भारत देश सक्षमपणे उभा होता. या देशाने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आरोग्यविज्ञानात केलेल्या प्रगतीचे हे द्योतक आहे, असे उद्गार सुनील केदार यांनी काढले. कोरोना काळात सावंगी मेघे रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय सेवेचेही ना. केदार यांनी कौतुक केले. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचा दाखल देत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी, कोविडबाबतच्या संशोधन कार्यात व शोधप्रबंध सादरीकरणात भारत पाचव्या क्रमांकावर असून देशांतर्गत मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाने तिसरे स्थान प्राप्त केले असल्याचे सांगितले. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आणि अत्यंत परिश्रमाने इंटेरिअर डिझाईनर म्हणून अल्पावधीत नावलौकिक कमावलेल्या आपल्या दिवंगत मित्राचे, सिद्धार्थ गुप्ता यांचे नाव या रुग्णालयाला देण्यात आल्याचे आमदार समीर मेघे यांनी यावेळी सांगितले. वयाच्या चाळिशीत ओरल कॅन्सर आणि नंतर फुफ्फुसाचा कॅन्सर सिद्धार्थच्या वाट्याला आला. मुंबईसारख्या महानगरात त्याच्यावर उपचार करण्यात आले, पण त्याचे प्राण मात्र वाचू शकले नाही, याची खंत व्यक्त करीत सिद्धार्थच्या नावाचे रुग्णालय कर्करुग्णांना दिलासा देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी, खासदार रामदास तडस आणि आ. रणजित कांबळे यांनीही आपल्या मनोगतातून सावंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेची प्रशंसा करीत कोरोनाकाळातील आरोग्यसेवेचा आवर्जून उल्लेख केला. केवळ देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरचे अद्यावत उपचार आणि साधनसामग्री या कर्करोग रुग्णालयात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी प्रास्ताविकात सांगितले.
रुग्णसेवा हे मानवतेचे कार्य – दत्ता मेघे
रुग्णसेवा हे मानवतेचे कार्य असून ज्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळू शकत नाहीत, अशा गरिबातल्या गरीब माणसालाही कर्करोगावर मोफत उपचार घेता आले पाहिजे यासाठी शासनाच्या योजनांसोबतच आमच्या रुग्णालयाच्या योजनाही सुरू आहेत. त्यासोबतच, जे कर्करोग टाळता येतात त्याबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचे कामही या रुग्णालयाद्वारे केले जाणार असल्याचा मानस दत्ता मेघे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. समर्थ शुक्ल यांनी केले तर आभार डॉ. नितीन भोला यांनी मानले. समारोहाला मेघे आयुर्विज्ञान संस्थेतील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
00000