Home ताज्या बातम्या वडाळागावात जुलूस उत्साहात; सजावटीने पालटले गावाचे रूप

वडाळागावात जुलूस उत्साहात; सजावटीने पालटले गावाचे रूप

0

नाशिक : वडाळागाव परिसरात प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ‘ईद-ए-मिलाद’चा उत्साह बघावयास मिळाला. रविवारी (दि.१०) सकाळपासूनच परिसरात मिरवणूकीची लगबग सुरू झाली. तरूणाईकडून घरे, दुकाने व आपला परिसर सजविण्यात आला होता. त्यामुळे मिरवणूक मार्गासह गल्लीबोळांचे रूप पालटल्याचे दिसून आले. जामा गौसिया मशिदीचे मुख्य इमाम मौलाना कारी जुनेद आलम यांच्या नेतृत्वाखाली वडाळागावातून सकाळी ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक काढण्यात आली.
जुने नाशिक, वडाळागाव, विहितगाव, देवळाली कॅम्प आदि भागात मुस्लीम तरूण मित्र मंडळांसह विविध संघटना, संस्थांकडून आपआपला परिसर आकर्षक पध्दतीने सजविण्यात आला आहे. येथील जामा गौसिया मशिद, सादिकीया मशिद, गरीब नवाज मशिदीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या. रझा चौक परिसरात ख्वाजा के दिवाने (केडी ग्रूप) युवक मंडळाकडून करण्यात आलेल्या आकर्षक सजावटीने सगळ्यांचे लक्ष वेधले. तसेच संजरी मार्ग कॉर्नरवर हुसेनी फ्रेन्ड सर्कल, मुस्तुफा सोसायटी फेन्ड सर्कल, अमन्स फेन्ड सर्कल, तैबानगर फ्रेन्ड सर्कल, मदिनानगर फे्रन्ड सर्कल, गरीब नवाज कॉलनी फ्रेन्ड सर्कलकडून आकर्षक सजावट करण्यात आली. ठिकठिकाणी मिरवणूकीत सहभागी धर्मगुरूंचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. मिरवणूकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दहा ते पंधरा मंडळांनी मिरवणूकीत सामील होत पैगंबरांवर अधारीत स्तुतीपर काव्य, दरूदोसलामचे सामुहिकरित्या पठण करत शिस्तबध्द संचलन केले. दारूलउलूम गौसिया फैजान-ए-मदारचे विद्यार्थी पारंपरिक गणवेशात सहभागी झाले होते. मिरवणूकीचे हे प्रमुख आकर्षण ठरले. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त वडाळागाव परिसरासह मिरवणूकीत ठेवण्यात आला होता.
जुलूस जामा गौसिया मशिद, खंडेराव महाराज चौक, वडाळा पोलीस चौकी, रजा चौक, मुस्तुफा सोसायटी, गणेशनगर, मोहम्मदीया कॉलनी, सावता माळी कॅनॉल रस्त्याने थेट शंभरफूटी रस्त्यावरून मदीनानगर, तैबानगर मार्गे, गरीब नवाज कॉलनी रस्त्यावरून पुन्हा मुख्य चौकातून चांदशावली बाबा दर्ग्यावर पोहचला. येथे मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. यावेळी मौलाना जुनेद आलम यांनी पैगंबरांनी समाजाला दिलेली मानवतेची शिकवण याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विचारमंचावर मौलाना नकीम, मशिदीचे विश्वस्त हाजी दादाभाई, एकबाल पटेल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फातिहा व दरूदोसलामचे सामुहिक पठण करत अन्नदानाला प्रारंभ करण्यात आला.