वडील अभ्यास करू देत नाहीत; मुलाची तक्रार

- Advertisement -

मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून त्यांना ओरडणारे अनेक पालक आपण पाहिले असतील, मात्र जामनेर शहरात नेमका याउलट प्रकार घडला आहे. एका १२ वर्षाच्या मुलाने वडील अभ्यास करू देत नाहीत म्हणून त्यांची तक्रार करण्यासाठी चक्क पोलीस ठाणे गाठलंय. वडिलांवर गुन्हा दाखल करावा म्हणून त्याने पोलीस ठाण्यात ठाण मांडल्याने पोलिसही गोंधळात पडले. 

अजय लक्ष्मण कुमावत (वय १२) असे तक्रारदार मुलाचे नाव आहे. तो जामनेर शहरातील भुसावळ रोड भागात आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत राहतो. त्याची आई शेतात मजुरी करते तर वडील मिस्त्री काम करतात. जामनेर तालुक्यातील शेंगोळे आश्रमशाळेत तो भावंडांसह शिकतो. वडील घरात सारखे त्रास देतात. अभ्यास करू देत नाहीत, आईलादेखील मारहाण करतात, अशा स्वरुपाची तक्रार घेऊन अजय बुधवारी दुपारी थेट पोलीस ठाण्यात आला. बाहेर पाऊस सुरू असताना एक लहान मुलगा हाफ चड्डी व बनियानवर भिजलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात येऊन बापावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागल्याने पोलिसही चक्रावले. त्यांनी त्याला नाव, गाव विचारायला सुरुवात करताच तो मोठ्या साहेबांना भेटायचे आहे, अशी गळ घालू लागला. काय गोंधळ चाललाय म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे त्याठिकाणी आले त्यांनी अजयला त्यांच्या दालनात नेले. येथे त्यांनी त्याची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तेव्हा अजयने सारी हकीकत सांगितली. त्याच्या तक्रारीची दखल घेऊन इंगळे यांनी त्याच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. नंतर त्याच्या वडिलांना समज दिली. 

अजयसाठी नवे कपडे-चप्पल…

अजय पोलीस ठाण्यात आला तेव्हा तो हाफ चड्डी व बनियानवर होता. त्याच्या पायात चप्पल नव्हती. हे पाहून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी अजयला बाजारात नेले. त्याला नवे कपडे, चप्पल घेऊन दिली. या घटनेमुळे अजयची शिक्षणाबद्दल असलेली तळमळ तर दिसून आली, शिवाय खाकीतील माणुसकीचेही दर्शन घडले. 

- Advertisement -