मुंबई, दि. १९ : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई वितरित करण्यात यावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला दिले.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक ठिकाणी माणसे जखमी होतात, तसेच शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होते. वन्यजीव संवर्धन करतांना वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाईची रक्कम वाढविण्याचा निर्णय वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी घेतला होता. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून बाधितांना ही भरपाई पंधरा दिवसाच्या आत देण्याचाही नियम केला गेला आहे.
ही भरपाई बाधितांना दिवाळीपूर्वी मिळावी, अशी सूचना वनमंत्र्यांनी केली होती. त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया गतिमान करत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची नुकसानभरपाई दिवाळी आधी वितरित करण्याचे आदेश आज वन विभागाच्या प्रधान सचिवांनी जारी केले आहेत.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/