
रायगड(जिमाका)दि.22: -वनपरिक्षेत्र अधिकारी, माथेरान कार्यालय व तपासणी नाका या नूतन इमारतीचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. वनमंत्री या नात्याने वन विभागाचे सौंदर्यीकरण, सशक्तीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कर्जत येथील माथेरान वन क्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू येथील तपासणी नाका यांचे उद्घाटन सोहळ्यास आ.महेंद्र थोरवे, राज्याचे प्रधान सचिव वन बाल प्रमुख शोमिता विश्वास, मुख्य वन संरक्षक ठाणे के प्रदिपा, उप वनसंरक्षक राहुल पाटील, प्रांताधिकारी प्रकाश संकपाल, पनवेल माजी नगराध्यक्ष सुनील घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, माझे वन ही शासनाची नाविन्यपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक रेंजमध्ये सुरंगी आणि बहाडोली या जांभळाच्या जातीची झाडे 100 एकर मध्ये लावा. या योजनेमध्ये प्रत्येक कार्यरत वन कर्मचारी यांनी वन विभागाचे कार्यक्षेत्रातील वनांपैकी कोणतेही 1 एकर क्षेत्राची निवड करुन सन 2025 चे पावसाळयांत, स्वेच्छेने व स्वखर्चाने त्यांच्या पसंतीच्या वृक्षांची लागवड करावयाची आहे. तसेच निश्चित केलेल्या क्षेत्रातील वृक्षांचे संपूर्ण संरक्षण व संगोपन करण्याचे आहे. या योजनेंतर्गत वनीकरण केल्यास एकूण कार्यरत पदांप्रमाणे साधारणतः 338 एकर क्षेत्रावर सन 2025 चे पावसाळयात वनीकरण होणार आहे. “माझे वन” योजनेमुळे वनीकरणावर वैयक्तिक दृष्ट्या लक्ष दिले जाणार असल्याने, अवनत वनांचे वनीकरण होऊन वृक्षाच्छादन वाढण्यास भरीव मदत होणार आहे. असा विश्वास श्री.नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले पारंपरिक रस्ते आहेत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अडथळे वन विभाग आणणार नाही आणि ते रस्ते डांबरीकरण केले जाईल.संयुक्त वन व्यवस्थापन ही योजना माझ्या कार्यकाळात सुरू झाली. त्यातून जंगले वाढली आहेत. कर्जत तालुक्यात वन उद्यान उभारण्यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. वन जमीन 21 टक्के असून माझ्या काळात पाच टक्के जमीन वाढवली जाईल असे शब्द दिला असून वन खात्यात बदली करण्यासाठी माझ्याकडे थेट या आणि कोणाचीही मध्यस्थी करू नका अशी सूचना त्यांनी वन कर्मचारी यांना केली.
मोरबे धरण मधील प्रकल्पग्रस्त यांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्नशील असून भविष्यात पोशीर धरण होत असल्याने त्यांना देखील नवी मुंबईत नोकरी देणार आहोत असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कर्जत आणि नेरळ या वाढवणाऱ्या वस्तीसाठी पाण्याची स्वंतत्र व्यवस्था करावी अशी सूचना मंत्रिमंडळ बैठकीत केली असून शासनाने त्याची नोंद घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्यमार्ग 76 वरील काही ठिकाणी वन विभागाने रस्त्यांची कामे थांबली आहेत.कर्जत हे ग्रीन कर्जत हब व्हावे यासाठी कर्जत मध्ये सुंगांधी झाडे लावावीत अशी मागणी यावेळी केली.
वन विभागाच्या राज्याचे प्रधान वन बल प्रमुख शोमीता विश्वास यांनी वन संरक्षण समिती यांचा जंगल राखण्यासाठी मोठा सहभाग राहिला असून एआय तंत्रज्ञानाची मदत घेऊन वन वणवे रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले तसेच माझे वन ही संकल्पना भविष्यात संपूर्ण राज्यात राबविण्यासाठी वन विभाग धोरण निश्चित करेल असे सांगितले.
यावेळी जागतिक दर्जाच्या ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रसाठी नागाव ग्रामपंचायत आणि वनविभाग यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एआय तंत्रज्ञानसाठी युनिव्हर्सल बिझनेस स्कूल बरोबर सामंजस्य करार करण्यात आला.
उप वनसंरक्षक राहुल पाटील यांची संकल्पना असलेल्या माझे वन या योजनेचे लोकार्पण वनमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच वनसंरक्षण आणि वनसंवर्धन यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी अलिबाग वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची आणि माझे वन यासंकल्पनेबद्दल माहिती दिली.
०००००००