वरळीतील धक्कादायक प्रकार; मृत व्यक्तीच्या नावाने सदनिका लाटण्याचा प्रयत्न

- Advertisement -

मुंबई : वरळीत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मृत व्यक्तीच्या नावानेच सदनिका लाटण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार, या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सोसायटीचे अधिकारी रमेश जाधव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झोपु योजनेअंतर्गत मायानगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितमधील रहिवाशांना सोडत पद्धतीने १ जून २०१६ रोजी सदनिकांचे वाटप करण्यात आले. याच सोडतीमध्ये मृत शांताराम लक्ष्णम दारोळे यांना ३०२ क्रमांकाची सदनिका वाटप करण्यात आली. वाटप करतेवेळी दारोळे गैरहजर असल्याने याबाबत संंस्थेकडे विचारणा करताच, त्यांच्याकडून सदनिका अदल-बदल करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला.

चौकशीत, दारोळे यांचे १३ मार्च १९९८ रोजी निधन झाले असतानादेखील सोसायटीकडून ते जिवंत असल्याचे भासवून खोटी कागदपत्रे सादर करीत सदनिका मिळवली. शिवाय, सह्यांपुढे त्यांचाच अंगठ्याचा ठसा असल्याचे दर्शविले. ही सदनिका शित्राम नितनवरे यांनी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष गोविंद सुरेश लोखंडे आणि नितनवरे यांनी संगनमत करून दारोळे यांच्या नावाने खोटी कागदपत्रे सादर करून प्राधिकरणाची फसवणूक केल्याचे स्पष्ट होताच जाधव यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

- Advertisement -