वर्ध्याच्या वाङ्मय समृद्धीचे पूर्वसुरी वैभव – महासंवाद

वर्ध्याच्या वाङ्मय समृद्धीचे पूर्वसुरी वैभव – महासंवाद
- Advertisement -

वर्ध्याच्या वाङ्मय समृद्धीचे पूर्वसुरी वैभव – महासंवाद

वरदा – वर्धा हे जिल्ह्याचे नाव साऱ्या दिगंतात प्रसिद्ध आहे. ते महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम वास्तव्यामुळे. प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्याचा इतिहास केवळ दीड-पावणेदोनशे वर्षाचा असला तरी जिल्ह्याच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र, या आधीच्या शतकात शोधता येतात, त्या प्राचीन- मध्ययुगीन कालखंडात गुणाढ्यसारख्या पैशाची भाषेच्या विद्वान, जगविख्यात ‘ब्रहत्कथां’ च्या जनकाच्या रूपात, त्याच्या हिंगणघाट तालुक्यात पोथरा या गावातील वास्तव्यामुळे ! वैश्विक दृष्ट्या लोकभाषा व लोककथांचा मुळारंभ म्हणून गुणाढ्यांनी लिहिलेल्या या बृहत्कथांकडे पाहिले जाते. गुणाढ्याची मूळ लेखनसंहिता आज उपलब्ध नाही.

गुणाढ्याच्या लोककथांचा आधार घेऊन क्षेमेंद्र यांनी ‘बृहत्कथा’ व सोमदेव यांनी ‘कथासरितासागर’ या दोन संस्कृत ग्रंथांची निर्मिती केली. ज्येष्ठ संशोधक व विदर्भातील लोकसाहित्याचे प्रख्यात अभ्यासक डॉ. भाऊ मांडवकर यांनी गुणाढ्य हे हिंगणघाट तालुक्यातील पोथरा गावातील मूळ रहिवासी असल्याचा दावा आपल्या ‘आदिजन’ या ग्रंथामध्ये केला आहे. ए. बेरेडल कीथ नावाच्या पाश्चिमात्त्य संशोधकाने कम्बोडिया येथे प्राप्त झालेल्या एका अभिलेखाच्या आधारे गुणाढ्याचा कालखंड शोधण्याचा प्रयत्न केला.

जागतिक साहित्यक्षेत्रात गुणाढ्याच्या कलाकृतीबाबत रोज नवी चर्चा होत असताना डॉ. भाऊ मांडवकरांच्या या संशोधनाकडे वैदर्भीय नव्या लोकसाहित्य अभ्यासकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते, वाशीम (वत्सगुल्म )आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोथराशी थेट संबध असणारा गुणाढ्य त्यातच अलीकडील काळात तो काश्मिरी होता, या तर्कावर अभ्यासकांमध्ये चर्वितचर्वण केल्या जात आहे. हा युक्तिवाद वैदर्भीय सांस्कृतिक विश्वाला धोक्याचा ठरू शकतो. देवळीचे मिरणनाथ महाराजांचे रामजी हरी फुटाणे उर्फ हरीसुत यांनी दीड शतकापूर्वी लिहिलेले गीतेवरील अभंग वृत्तात अतिशय सुमधुर भाष्य संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. गणेश मालधुरे यांनी अलीकडील काळात प्रकाशात आणले आहे. संत साहित्यात भर टाकणारे आहे.

महत्त्वाचा गुणाढ्याचा हा संदर्भ सोडल्यास वर्ध्याच्या वाडमयीन परंपरेची मुळे खऱ्या अर्थाने रुजली ती आधुनिक काळातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात ती म्हणजे गांधीजींच्या आगमनानंतरच! म्हणूनच असे म्हटल्या जाते वर्धा जिल्ह्याला फारशी साहित्य परंपरा नाही. नभांगणात अधूनमधून एखादा दुसरा तारा चमकावा, असं कधी कधी घडत असतं. एकतर गांधी, विनोबांच्या राजकीय परंपरेने या जिल्ह्याचे अवघे विश्व झाकोळल्या गेलेले आहे. अजूनही हा जिल्हा या छायेतून बाहेर पडलेला नाही. परंतु याच गांधी, विनोबांच्या वास्तव्याने काही विद्वान, संस्कृती, साहित्य व कलापुरुषांचा वर्ध्याला स्पर्श झाला, हेही तेवढेच खरे!.

स्वतः विनोबा भावे (११ सप्टेंबर १८९५ – १५ नोव्हेंबर १९८२) संत, प्राच्यविद्या पारंगत व थोर साहित्यिक होते. ‘गीताई’, ‘मधुकर’सारखी अजरामर रचना, ‘गीता प्रवचने’ सारखे अजोड साहित्य त्यांनी निर्मिले.

ज्यात अष्टादशी (सार्थ), ईशावास्यवृत्ति, उपनिषदांचा अभ्यास, गीताई-चिंतनिका, गुरूबोध सार (सार्थ), जीवनदृष्टी, भागवत धर्म-सार, लोकनीती, विचार पोथी साम्यसूत्र, साम्यसूत्र वृत्ति, स्थितप्रज्ञ-दर्शन ही विनोबाची विपुल ग्रंथ संपदा आहे. विनोबांचा वारसा दादा धर्माधिकारी यांनी ( जन्म इ.स. १८८९ तर मृत्यू १ डिसेंबर, १९८५) त्यांच्या आपल्या गणराज्याची घडण (मराठी), गांधीजी की दृष्टी, तरुणाई, दादांच्या बोधकथा, बाग १ ते ३, दादांच्या शब्दांत दादा, भाग १, २., नागरिक विश्वविद्यालय – एक परिकल्पना, प्रिय मुली, मानवनिष्ठ भारतीयता, मैत्री, क्रांतिवादी तरुणांनो, लोकशाही विकास आणि भविष्य, सर्वोदय दर्शन, स्त्री-पुरुष सहजीवन, हे ग्रंथ तर त्यांचे सुपुत्र न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (जन्मतारीख: २० नोव्हेंबर, १९२७ मृत्यू: ३ जानेवारी, २०१९) यांनीही अंतर्यात्रा, काळाची पाऊले, न्यायमूर्ती का हलफनामा (हिंदी), भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंझिल दूरच राहिली!, माणूसनामा, मानवनिष्ठ अध्यात्म, लोकतंत्र एवं राहों के अन्वेषण (हिंदी), शोध गांधींचा, समाजमन, सहप्रवास, सूर्योदयाची वाट पाहूया आदी ग्रंथातून विपुल लेखन केले आहे .

पु. य. देशपांडे (जन्म ११ डिसेंबर १८९९ मृत्यु २६ जुलै १९८६ ) यांच्या बंधनाच्या पलिकडे, सदाफुली , अनामिकाची चिंतनिका -1962 साहित्य अकादमी पुरस्कार भेविघोष- धर्मघोष, काळी राणी, मयूरपंख, विशाल जीवन कादंबऱ्या व गांधीजीच का? हे वैचारिक लेखन, आचार्य काका कालेलकर यांची गुजराथी – हिंदी- मराठीतील वैविध्यपूर्ण साहित्य संपदा, भदंत आनंद कौसल्यायन, भवानीप्रसाद मिश्र, शंकरराव देव, आचार्य जावडेकर, श्रीकृष्णदास जाजू, श्रीमन्नारायण, कुंदर दिवाण, रामेश्वर दयाल दुबे, डॉ. म. गो.बोकरे, मदालसा नारायण, प्रा. निर्मला देशपांडे, मधुकरराव चौधरी, ठाकूरदासजी बंग, सुमनताई बंग यांची वैचारिक लेखनाची परंपरा डॉ. अभय बंग पुढे नेतांना दिसतात गांधीवादी साहित्य परंपरा इथेच थांबत नाही, तर पुढच्या काळात बौद्ध पंडित प्रो. धर्मानंद कोसंबी या प्रभावळीत येऊन सामील होतात. वामनराव चोरघडे यांच्या संस्कारक्षम कथांच्या पहिला संग्रहाचा बहर येथेच बहरतो आणि पुढे मराठी लघुकथेच्या मांदियाळीत दाखल होतांना दिसतो, त्यांची खरी ‘जडण घडण’ (आत्मचरित्र, १९८१) वर्ध्यातच झालेली आहे. तर आजही ‘खादीशी जुळले नाते’ या आत्मकथनातून रघुनाथ कुलकर्णी यांनी स्वतःच्या जीवनप्रवासातून भारताच्या खादी क्षेत्रातील वाटचालीचं खरखुरं चित्र रेखाटलं आहे .

कवी मंगेश पाडगावकरांना ‘जिप्सी’ची भेट याच गांधीनगरीत होते, आधुनिमराठी कवितेचे जनकत्व ज्यांना बहाल केले गेले, त्या केशवसुतांचे बालपण वर्ध्यात मामांकडे गेलेले! गांधीजींच्या वर्ध्यात येण्यापूर्वी महात्मा फुलेंची ओळख साऱ्या जगाला करून दिली ती याच शहराने, ते त्यांचे पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले चरित्र येथील जिनदासजी चवडे यांनी छापून नि प्रसिद्ध करूनच ! जीनदासजी चवडे यांनी विपुल अशी जैन साहित्य निर्मिती करून त्याकाळात पहिला अद्यावत छापखाना काढून, सत्यशोधक चळवळीच्या साहित्य निर्मितीस प्रकाशनाच्या माध्यमातून मोठे बळ दिले होते. तसेच सत्यशोधकी पत्रकारितेचे वैचारिक व प्रबोधनाचे सत्र यावेळी वर्ध्यात यांच्यामुळे निर्माण झाल्याचे दृष्टीपथात येते. याच काळात पूर्व विदर्भात जीनदास चवडे बंधूंची संगीत नाटके खूप गाजलीच नव्हे, तर या भागात संगीत नाटकांचे लेखन व सादरीकरणाचे प्रवर्तनकत्व त्यांना जाते.

वर्ध्यात महात्मा गांधीजी येण्यापूर्वी लोकमान्य टिळक येथे आलेले होते, पुढे त्यांचे प्रत्यक्षपणे वर्ध्याशी नातेही जुळलेले. गांधीजींची पत्रकारिता व स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम येथून झालेली असल्याने हा कालखंड गांधीवादी साहित्याने प्रभावित झालेला; परंतु संतसाहित्याची परंपरा ल. रा. पांगरकरांसारखे व्यासंगी अभ्यासक, प्रा. अ.ना.देशपांडे, प्रा.मा.शं वाबगावकर, सुप्रसिद्ध कवी आणि वक्ते मधुकर केचेंचा जन्म देखील वर्धा नदीच्या कुशीत असलेल्या अंतोरा या गावचा, लेखक कादंबरीकार व संशोधक डॉ. भाऊ मांडवकर यांनी वर्ध्यात शिक्षण व काही काळ नोकरी निमित्त केलेले वास्तव्य या साहित्य प्रांतात छाप पाडून गेले.

विजयराज बोधनकर हे मुळात चित्रकार असून ते सध्या मुंबईत स्थायिक असलेले लेखक म्हणून त्यांचे गागरा हे आर्वी तालुक्यातील धनोडी बहाद्दर च्या आठवणीवरील पुस्तक, साहित्यिकांची स्वभावचित्रे व आपला स्वभाव जाणून घ्यायची असेल तर त्यांची अर्कचित्रे लक्षणीय ठरावी.

एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय मुसाफिरी केली ते पंडित कवी मोरोपन्तांच्या केकावलीचे भाष्यकार श्रीधर विष्णु परांजपे, त्यांचे पुत्र भाषा व संतसाहित्याचे अभ्यासक भा. श्री. परांजपे यांचे वसंताच्या खुणा, दख्खनचा वाघ, नवनाथ, मत्स्येंद्रनाथ, मुलांसाठी माडखोलकर, तर डॉ. जयंत परांजपे ‘ग्रेस आणि दुर्बोधता’ या पुस्तकांच्या रूपाने पुढे चालविलेली दिसते. देवळीचे मिरणनाथ महाराजांचे रामजी हरी फुटाणे उर्फ हरीसुत यांनी दीड शतकापूर्वी लिहिलेले गीतेवरील अभंग वृत्तात अतिशय सुमधुर भाष्य संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. गणेश मालधुरे यांनी अलीकडील काळात प्रकाशात आणले आहे. संत साहित्यात भर टाकणारे आहे.

डॉ. सदाशिव डांगे – हिंदूधर्म आणि तत्वज्ञान, अश्वत्थाची पाने, क्रिटीक ऑन संस्कृत ड्रामा हे पुस्तके आहेत. म. ल. वऱ्हाडपांडे – कोल्हटकर आणि हिराबाई, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, भ्रमर परागु ट्रॅडिशन्स ऑफ इंडियन थिएटर, गोविंद विनायक देशमुख – कालसमुद्रातील रत्ने (३ खंड) पद्माकर गणेश चितळे – इमला, भोगनृत्य, पोर्टर, डाळिंबाचे दाणे, समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांची या मनाचा पाळणा, कोल्होबाची करामत, भारतीय स्त्रीरत्ने, नागपुरी बोली : भाषाशास्त्रीय अभ्यास करून नागपुरी बोलीची सुरुवात सेलू तालुक्यातील महाबळा या गावापासून होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे, न्यायतीर्थ स्वामी सत्यभक्त यांचे सत्येश्वर गीता, दिव्य दर्शन, सत्यामृत आदी असंख्यग्रंथ रचना त्यांनी केली. नंतरच्या कालखंडात मो. दा. देशमुख, दिवाकर देशपांडे, डॉ. मधुकर आष्टीकर यांनी नाटककार, विनोदी लेखक म्हणून नावलौकिक मिळविला.

मो. दा. देशमुखांच्या घराण्याचा न्यायदंड या नाटकाने इतिहास घडविला. यानंतरच्या कालखंडात दे. गं. सोटे यांनी सोटेशाही व वऱ्हाडी शब्दकोश निर्माण केला, प्राचार्य डॉ. विद्याधर उमाठे, विजय कविमंडन ‘रेसकोर्स’ यांच्यासारखी लेखक-कवींची पिढी उदयाला आलेली दिसते. सर्वोत्कृष्ट कथांचे कालखंडानुसार संपादन करणारे डॉ. राम कोलारकर हे मूळ हिंगणघाट येथीलच. ‘ज्वाला आणि फुले’चे कवी आणि विख्यात समाजसेवक बाबा आमटे यांचे जन्मगावही हेच, आर्वीचे आजोळ असणारे तत्वज्ञानाचे अभ्यासक आणि सौंदर्याचे व्याकरण लिहिणारे डॉ . सुरेंद्र बारलींगे तसेच दलित साहित्यातील पहिल्या पिढीचे अग्रगण्य कथाकार अमिताभ हेही हिंगणघाटचे. नाट्यसमीक्षक द. रा. गोमकाळे, पाच नाटके चे लेखक श्रीराम अट्रावलकर, नाटककार नाना ढाकुलकर यांनी – त्यागवती रमाई आणि रावणावर लिहिलेले लंकेश कादंबरी त्यासह अनेक नाटिका लिहिल्या आहेत. हे निर्विवाद वाडमयीन वैभव वर्ध्याची वाड्मय समृद्धी स्पष्टपणे अधोरेखित करणारे आहे .

डॉ. राजेंद्र मुंढे

आर्वी नाका, ज्ञानेश्वर नगर, वर्धा

चलभाष  – ९४२२१४००४९

- Advertisement -