Home शहरे मुंबई वर्ल्डकप सामन्यावर सट्टा सुरुच; दोन बुकींना अटक

वर्ल्डकप सामन्यावर सट्टा सुरुच; दोन बुकींना अटक

मुंबई : वर्ल्डकप सामन्यावर सट्टा सुरुच असल्याचे मुंबई पोलिसांनीकेलेल्या कारवाईतून समोर आले आहे. वर्ल्डकप सामन्यावरील सट्टेबाजीप्रकरणी दादरमध्ये केलेल्या कारवाईपाठोपाठ जुहू पोलिसांनीगुरूवारी इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज़ सामन्यावर सट्टा लावणाऱ्या गुजरातच्या दोन बुकींना बेड्या ठोकल्या आहेत. धरमभाई भाबलुभाई वाला, बिपीनभाई ब्रहमभट्ट अशी अटक दुकलीची नावे आहेत.
जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाख़ाली ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री सन अँड सँड हॉटेलच्या चौथा माळ्यावरील रुम नं ४३० मध्ये सट्टा सुरु असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने छापा टाकला. तेव्हा धरमभाई, बिपीनभाई हे दोघे वर्ल्डकप सिरीजमधील इंडिया आणि वेस्ट इंडीज़ संघादरम्यान सुरु असलेला सामना खोलीच्या भिंतीवर लावलेल्या टिव्हीवर पाहून सट्टेबाजी करत होते. 
सट्ट्याबाबत संभाषण करत त्याबाबतचा नोंदी नोंदवून व लॅपटॉपमधे घेत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून २४ मोबाईल फोन,एक टॅब, दोन लॅपटॉप, रोख रक्कम ४४ हज़ार ६७० असा एकूण २ लाख ५५ हज़ार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक हरिभाउ गोविंदराव बिरादार (34) यांच्या तक़्रारीवरून जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरमभाई हा अहमदाबाद तर बिपीनभाई हा गुजरातचा रहिवासी आहे. दोघांकड़े जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.

दादरमधील पोलीस उपनिरीक्षकासह अन्य आरोपीकड़े चौकशी
वर्ल्डकप सामन्यावरील सट्टेबाजीप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अटक केलेले बुकी मिकीन शहा (33)  याच्यासह त्याचे साथीदार मनीष सिंग (31) आणि प्रकाश बनकर (32) हे वर्ल्डकप सिरीजमधील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडवर सट्टा लावत होते. तसेच भायखळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर खरमाटे (34) हा सामना बघत होता. पोलिसांनी छापा टाकताच खरमाटेसह चौघांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.