वसई-विरार महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा करोना लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद झाले आहे. तर केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यातच लसीकरण केंद्रे केवळ दोन असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये चार दिवसांपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद झाले आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेने लशींचा साठा संपल्याने सुरुवातीला गुरुवारी आणि शुक्रवारी लसीकरण बंद ठेवले होते. मात्र त्यानंतर शनिवारपासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्याने केवळ याच वयोगटातील नागरिकांसाठी साठा पालिकेकडे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसाठीचा साठा संपल्याने हे लसीकरण सोमवारीदेखील बंद होते. त्यामुळे दुसरा डोस बाकी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकांचा पहिल्या डोसनंतर ४५ दिवसांच्या वर कालावधी उलटला आहे. या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठीची व्यवस्था पालिकेतर्फे करण्यात येत आहे. वसई पूर्व आणि पश्चिम येथे प्रत्येकी एक अशी लसीकरण केंद्रे तयार करण्यात येत आहेत. वसई पूर्व भागात अग्रवाल रुग्णालय येथे हे केंद्र उभे राहील आणि पश्चिमेकडे जागा शोधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त डॉ. किशोर गवस यांनी दिली.
त्यातच शनिवारपासून पालघर जिल्ह्यासह वसई-विरारमध्ये १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. पालघर जिल्ह्यात पाच लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली असून त्यातील वसई-विरार महापालिकेत केवळ दोन लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध होत आहे. पालिका हद्दीतील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यांना केवळ दोन लसीकरण केंद्रे उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. बोळींज आणि वसई या दोनच केंद्रांवर लसीकरण होत आहे. सोमवारी येथे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लशींचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांना आल्या पावली परतावे लागले.
सध्या १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लशींचा साठा उपलब्ध नसल्याने सरकारकडून तो मिळाल्यानंतर त्यांचे तत्काळ लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या डोससाठी या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी विशेष लसीकरण केंद्रेदेखील तयार करण्यात येत आहेत.
– डॉ. किशोर गवस, उपायुक्त, वसई-विरार महापालिका