
मुंबई, दि. २८ – वाचन, अभ्यास आणि मेहनत ही यशाची त्रिसूत्री आहे. यशाचे शिखर गाठायचे असेल तर तरुणांनी या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे सुरू असलेल्या ‘मुंबई पुस्तक महोत्सव २०२६’मध्ये ‘कादंबरी लेखनातील प्रयोग’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. पुस्तकांचे महत्त्व, अभ्यासाची शक्ती आणि मराठी भाषेवरील प्रेम यांवर त्यांनी प्रभावी विचार मांडले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय, नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहभागाने हा महोत्सव २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्रीमती तपस्या नेवे यांनी विश्वास पाटील यांच्याशी संवाद साधला. पुस्तकांच्या सामर्थ्याविषयी बोलताना श्री. पाटील म्हणाले, “पुस्तकांनी आणि अभ्यासाने माणसाला जेवढे घडवता येते, तेवढे दुसरे काहीही घडवू शकत नाही.” नेपोलियन बोनापार्टच्या टेबलवर बायबलमधील ‘न्यू टेस्टामेंट’ असायचे आणि तो ते नियमितपणे वाचायचा. ‘महान माणसे जी उंची गाठतात, ती एका झेपेत गाठलेली नसते; इतर झोपलेले असताना ती रात्रभर कष्ट करत असतात’ या आशयाच्या विचाराची आठवण श्री पाटील यांनी करून दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविल्याच्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी संमेलनाचे वेगळेपण अधोरेखित केले. “भाषेच्या प्रेमापोटी लाखो लोक एकत्र येतात, ही मराठी साहित्य संमेलनाची खास ओळख आहे,” असे ते म्हणाले. आपल्या भाषेवर, संस्कृतीवर आणि ग्रंथांवर जसे आपण प्रेम करतो, तसेच प्रेम इतर भाषिकांनीही आपापल्या भाषेवर करावे, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी तपस्या नेवे यांनी विश्वास पाटील यांचे आभार मानले. हा संवाद वाचनाकडे वळण्यास तरुणांना प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
००००

WhatsApp