Home ताज्या बातम्या वाढीव सरसकट भरपाई नाही

वाढीव सरसकट भरपाई नाही

0
वाढीव सरसकट भरपाई नाही

मुंबई: ‘भूसंपादनाच्या प्रकरणांत लोकअदालतकडून एखाद्या प्रकरणात वाटाघाटीने वाढीव नुकसानभरपाईचा निवाडा झाला असल्यास त्याच भूसंपादन गटातील अन्य जमीन मालकांना वाढीव नुकसानभरपाईचा अर्ज करण्यासाठी त्या निवाड्याचा आधार घेता येणार नाही. कारण भूसंपादन कायद्यातील कलम २८-अ अंतर्गत तो न्यायालयाचा आदेश मानता येणार नाही,’ असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणाच्या निमित्ताने दिला आहे.

सोलापूरमधील उमादेवी जेऊरे व अन्य काहींच्या जमिनींचे भूसंपादन राज्य सरकारने तलावाच्या उभारणीसंदर्भात दशकभरापूर्वी केले होते. त्याविषयी २६ फेब्रुवारी २०१० रोजी भूसंपादनाचा आदेश काढून त्यानुसार जमीनमालकांना आर्थिक मोबदला देण्यात आला होता. मात्र, याच भूसंपादनाच्या अधिसूचनेंतर्गच्या जमिनींपैकी एका जमिनीचे मालक संगप्पा दाबारे यांनी वाढीव भरपाईसाठी दिवाणी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर हा वाद लोकअदालतसमोर वर्ग झाला आणि वाटाघाटींनंतर दाबारे यांना वाढीव भरपाई देण्याविषयीचा निवाडा लोकअदालने १३ डिसेंबर २०१४ रोजी दिला. भूसंपादन कायद्यातील कलम २८-अ अन्वये भूसंपादनाच्या एकाच अधिसूचनेतील एखाद्या जमिनीबाबत वाढीव भरपाईचा आदेश न्यायालयाकडून झाला असल्यास, त्याआधारे त्या आदेशाच्या ३० दिवसांच्या आत अन्य जमीनमालकांनाही वाढीव भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे फेरनिश्चितीचा अर्ज करता येतो. त्याआधारे उमादेवी व अन्य काहींनीही वाढीव भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जाचा विचार केल्यानंतर दाबारे यांच्याविषयीचा लोकअदालतचा निर्णय हा तेवढ्या प्रकरणापुरताच होता, असे स्पष्ट करत उपविभागीय अधिकाऱ्यांनी उमादेवी व अन्यचा अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी अॅड. अशोक ताजणे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिकेद्वारे त्याला आव्हान दिले होते.

‘भूसंपादन कायद्यातील कलम २८-अ अन्वये करण्यात येणाऱ्या अर्जांविषयी लोकअदालतचा निवाडा हा भूसंपादन कायद्याच्या पार्ट ३ अंतर्गत न्यायालयाचा निवाडा म्हणून गृहित धरला जाऊ शकतो का?’, असा प्रश्न यानिमित्ताने न्या. अमजद सय्यद व न्या. एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठासमोर विचारार्थ आला होता. ‘भूसंपादन कायद्याच्या कलम २१ अन्वये लोकअदालतचा निवाडा हा दोन्ही पक्षकारांसाठी अंतिम व बंधनकारक असतो आणि त्याविरोधात अपील करता येत नाही. त्यामुळे तो दिवाणी न्यायालयाचा निवाडा मानला जातो,’ असा याचिकादारांचा युक्तिवाद होता. तर, ‘लोकअदालतच्या निवाड्याची अंमलबजावणी व्हावी, या हेतूने तो न्यायालयाचा निवाडा म्हणून गृहित धरण्याची तरतूद आहे. मात्र, भूसंपादन कायद्याच्या पार्ट-३ अंतर्गत दिवाणी न्यायालयाकडून होणाऱ्या निवाड्याप्रमाणे त्याचा अर्थ घेतला जाऊ शकत नाही. लोकअदालतमध्ये एका किंवा दोन्ही पक्षकारांच्या इच्छेप्रमाणे वाटाघाटीद्वारे प्रकरण मिटवून निवाडा होतो. तो त्या दोन पक्षकारांपुरता असतो,’ असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मांडला. तो खंडपीठाने ग्राह्य धरला.

लोकअदालतचा निवाडा हा न्यायालयाचा निवाडा असल्याचे गृहित धरून त्याआधारे अन्य जमीन मालकांनाही कलम २८-अ अन्वये भरपाईच्या फेरनिश्चितीची मागणी करता येणार नाही.

– मुंबई उच्च न्यायालय

Source link