अकोला, दि.७ (जिमाका)- वारंवार पूरबाधित होणाऱ्या गावांमध्ये पूरनियंत्रणाच्या कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा आराखडा तयार करा व प्रस्ताव पाठवा, तसेच नजिकच्या काळातील पावसाचे अनुमान लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपापल्या मुख्यालयी सज्ज रहावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव तथा अकोला जिल्ह्याचे पालक सचिव सौरभ विजय यांनी आज येथे दिले.
पालकसचिव सौरभ विजय यांनी आज जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, उपायुक्त महसूल संजय पवार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
पालक सचिवांनी बैठकीत पीक कर्ज, पीक विमा, खते बियाणे उपलब्धता, बियाणे खतांसंदर्भातील साठेबाजी व भेसळीसंदर्भात केलेली कारवाई, पूरनियंत्रणाचे नियोजन, कोविड सद्यस्थिती, साथरोग नियंत्रण, औषधांची उपलब्धता, कोविड लसीकरण इ. मुद्यांचा आढावा घेतला. पालक सचिवांनी निर्देश दिले की, ज्या गावांना प्रत्येक पावसाळ्यात पुराचा वेढा असतो, अशा गावांमध्ये पूरनियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांचे नियोजन करावे, जेणे करुन ही गावे पुन्हा पुरबाधित होता कामा नये व पूर या आपत्तीपासून ही गावे कायम सुरक्षित असावीत. जिल्ह्यात कोविडच्या अनुषंगाने लसीकरणासाठी प्रयत्न वाढवावेत. पुराची वारंवारता असणाऱ्या गावांमध्ये मदत बचाव साहित्य पोहोचवून ठेवावे. तसेच मदत व बचाव कार्याची रंगीत तालीमही घ्यावी. साथरोग टाळण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करत रहा.
पालक सचिवांसमोर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त कविता द्विवेदी यांनी माहिती सादरीकरण केले.
बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात ५३ महसूल मंडळांमध्ये रेनगेज व ॲटोमॅटिक वेदर स्टेशन यंत्रणा कार्यान्वित आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत दि.२८ जून रोजी बाळापूर तालुक्यात ६६.३ मि.मी, पारस मंडळात ८३ मि.मी., व्याळा मंड।ळात ९९ मि.मी., बाळापूर मंडळात ८३ मि.मी अशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तसेच मांजरी ते अकोला हा रस्ता खचला असून मांजरी गावाला जोडणारा पूल वाहुन गेला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्यात मोठे-२, मध्यम ३ तर लघु ३३ असे एकूण ३८ प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी काटेपूर्णा प्रकल्पात २५.९६ द.ल.घ.मि, वान धरणात ३२.९३ द.ल.घ.मि, मध्यम प्रकल्पांपैकी उमा धरणात १.७२, मोर्णा प्रक्ल्पात १५.९४ तर निर्गुणा प्रकल्पात ७.६२ द.ल.घ.मि, जलसाठा शिल्लक आहे.
यंदाच्या जून महिन्यापासून निंबी ता. बार्शी टाकळी, मजलापूर ता. अकोला, आलेगाव ता. पातूर येथे अशा तिन व्यक्ती नैसर्गिक आपत्तीमुळे (वादळ व वीज पडून) मृत झाल्या आहेत. तर सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण २० घरांची अंशतः पडझड झाल्याची नोंद आहे. जून महिन्यातच अतिवृष्टी व पुरामुळे १३३५ हे.आर क्षेत्रावर शेतीपिक व फळपिकांचे नुकसान झाले असून पंचनामे सुरु आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३लक्ष ६१ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या असून प्रमाण ७८.२५ टक्के इतके आहे.
जिल्ह्यात एकूण ८३ गावे पुरबाधीत म्हणून नोंद आहे. याठिकाणी खबरदारीच्या व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पूरबाधीत गावांची नावे अकोला तालुका- अकोला शहर, म्हैसांग, एकलारा, कपिलेश्वर, वडद बु., दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदुर, सांगवी बु., कुरणखेड, गोत्रा, आगर. बार्शीटाकळी तालुका- चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरघेड, वाघजळी, दोनद खु., टाकळी, राजंदा, सुकळी, वरखेड, सिंदखेड. अकोट तालुका- केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरि, पिकलवाडी, कुटासा, मुंडगाव, अकोट, करोडी, वरुर. तेल्हारा तालुका- मन्नात्री बु., डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवई, उमरी, पिळवंद, दानापुर, सौदाळा, वारखेड. बाळापूर तालुका- वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरुण, रिधोरा, सोनाळा, बोरगाव वैराळे. पातुर तालुका- पाटसुल, भंडारज खु., आगीखेड, कोठारी बु., चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बु., सस्ती, तुलंगा. मुर्तिजापूर तालुका- हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापुरा, हिवरा कोरडे, लाखपुरी, माना, खांदला, पोही, उनखेड.
पुरबाधीत गावांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यासाठी शाळा खोल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्यांचे प्रशिक्षण झाले असून सर्व साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे.
०००००