वाराणसीच्या या ट्रेनमध्ये आहे महादेवाचे मंदीर, पंतप्रधानांनी दाखवला होता हिरवा झेंडा

- Advertisement -

वाराणसी : वाराणसीच्या महाकाल एक्सप्रेसमध्ये महादेवाचे मंदीर तयार करण्यात आले आहे. महाकाल एक्सप्रेसमधील प्रवाशांना आता आध्यात्मिक वातावरणात प्रवास करता येणार आहे. महाकाल एक्सप्रेसच्या बोगी नंबर बी-5 मध्ये सीट नंबर 64 हे महादेवासाठी आरक्षित असणार आहे. या ट्रेनच्या एका सीटवर लहान मंदिर उभारण्यात आले आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता.

महाकाल एक्सप्रेसमध्ये धार्मिक प्रवाशांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनोरंजन आणि आध्यात्माची जाणिव व्हावी यासाठी भजन-किर्तनाचे आयोजन केले जात आहे. सुरूवातीच्या दिवसात एक मंडळ येथे भजन-किर्तन करणार आहे. 20 फेब्रुवारीलाही एक मंडळ या ट्रेनमध्ये भजन-किर्तन करेल. यानंतर कॅसेट किंवा अनाउंसमेंटच्या माध्यमातून प्रवासी भजन-किर्तन ऐकू शकणार आहेत.

20 फेब्रुवारीपासून वाराणसीहून इंदूरकडे जाणाऱ्या काशी-महाकाल एक्स्प्रेसमध्ये आठ वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचे पॅकेजही असेल. आयआरसीटीसीने वाराणसी, अयोध्या, प्रयागराज, इंदूर, उज्जैन, भोपाळ येथील धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे पॅकेजही तयार केले आहे. काशी महाकाल एक्सप्रेस यूपी आणि मध्य प्रदेशातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा पुरवेल. यामुळे दोन्ही राज्यांच्या पर्यटनाला चालना मिळेल.

- Advertisement -