जळगाव : भरधाव वेगात जात असलेले वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर मोहाडीजवळ रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्डयात कोसळल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली़ दरम्यान, ट्रॅक्टरखाली दबल्यामुळे चालक विनोद महारू मालचे (४०, रा़ मोहाडी) याचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
सोमवारी सकाळी वाळू भरल्यानंतर ट्रॅक्टर घेवून विनोद मालचे हा चालक नागझिरी शिवाराकडून मोहाडी गावाच्या दिशेने भरधाव निघाला होता़ त्यातच मोहाडी गावाजवळ रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी मोठ-मोठे खड्डे खोदण्यात आले आहे़ विनोद हा भरधाव वेगात ट्रॅक्टर घेवून जात असताना अचानक त्या खड्डयाजवळ ट्रॅक्टरचे ब्रेक लागले व अन् ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्षणात त्या आठ ते दहा फुट खोल खड्डयात कोसळले़
अन् विनोदचा जागीच मृत्यू
खड्डयात ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळल्यानंतर चालक विनोद मालचे हा देखील ट्रॅक्टरखाली दाबला गेला़ त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच आजू-बाजूच्या परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेवून एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली़ त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक विशोल सोनवणे, रतीलाल पवार, नीलेश भावसार, जितेंद्र राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढला़
क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर काढले बाहेर
आठ ते दहा फुट खोल खड्डयात ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळल्यामुळे ते बाहेर काढण्यास नागरिकांसह पोलिसांना अडचणी येत होत्या़ अखेर सायंकाळी क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर खड्डयातून बाहेर काढण्यात आले़ दुसरीकडे विनोदचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेवून त्याच्यावर शवविच्छेदन केले़ नंतर कुटूंबीयांना मृतदेह ताब्यात देण्यात आले आहे़ याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़