Home ताज्या बातम्या वाहतूक कोंडीतून सुटका नाहीच

वाहतूक कोंडीतून सुटका नाहीच

0
वाहतूक कोंडीतून सुटका नाहीच

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : पावसाने विश्रांती दिल्याने नोकरी, व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा अतिप्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. करोना निर्बंधाचे कारण देत सरकारने सामान्यांना लोकलबंदी लागू केल्याने रस्ते प्रवास हा एकमेव पर्याय जनतेसमोर आहे. प्रवाशांच्या मुलभूत समस्या सोडवण्यावर प्रशासन काणाडोळा करत असल्याने दाद मागायची कोणाकडे असा संतप्त सवाल मुंबईकरांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबईतील करोना बाधितांचा दर २.३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे कारण देत कडक निर्बंध कायम राखत लोकलमध्ये सामान्यांना बंदी, रिक्षा-टॅक्सीमध्ये मर्यादित प्रवासी, बसमधून उभ्याने प्रवास करण्यावर बंदी आहे. नियम मोडल्यास राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ‘मुलुंड ते बोरिवली घोडबंदरमार्गे प्रवासासाठी सकाळी गर्दीच्या वेळेत दोन ते तीन तास लागतात. रात्री अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यांवरून होत असल्याने प्रवास वेळ चार तासांपेक्षा अधिक होतो. यामुळे इंधन विनाकारण जळते, प्रदूषण वाढते शिवाय मानसिक त्रास वेगळाच’, अशी प्रतिक्रिया स्वप्नील वाघमारे यांनी दिली.

रेल्वे, रिक्षा-टॅक्सी, बस प्रवासावरील कडक निर्बंधामुळे रस्त्यांवर वाहनांच्या संख्येत अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रस्त्यांची दुरवस्था, जागोजागी खड्डे यांमुळे शहरांतील वाहनांचा सरासरी वेग हा अवघ्या २५ ते ३५ किमीप्रतितास असल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईची ही स्थिती असून सरकारकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे कोणत्याही उपाययोजना राबवण्यात येत नाही.

कर की लूट ?

मुंबईत पेट्रोल प्रति लिटर १०७.८३ आणि डिझेल ९७.४५ रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार ढोबळमानाने पेट्रोलची मूळ किंमत ३६ ते ३७ रुपये मानली जाते. पेट्रोल विक्री करणाऱ्यांचे कमिशन ३ ते ४ रुपये प्रति लिटर. १०७पैकी ४० रुपये खर्च धरडल्यास उर्वरित ६७ रुपये केंद्र आणि राज्य कर म्हणून घेतात. हा कर आहे की लूट असा समाजमाध्यमावरील संदेश मुंबईकरांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

येथे रोजच कोंडी

एलबीएस मार्ग, मुलुंड टोल नाका, सायन पूल, दहिसर टोलनाका अशा सर्वच मोक्याच्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी रोजचीच असते. अनेक ठिकाणी विकासकामांसाठी उभारण्यात आलेले बॅरिकेड्स अडचणीचे ठरत आहे. असे असले तरी प्रशासनाची कोंडी फोडण्याबाबत निर्णय घेण्यापेक्षा दिवस ढकलण्याची मानसिकता अधिक जबाबदार असल्याचा सूर ही मुंबईकरांमधून उमटत आहे.

म. टा. भूमिका

निर्बंध शिथिल करण्याची वेळ

मुंबईतील करोना बाधितांचा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने निर्बंध शिथिल करण्याचा केवळ विचार नव्हे, तर निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची स्थिती भीषण आहे. रेल्वे-रिक्षा-टॅक्सी-बस प्रवासावर निर्बंध आहेत. करोनामुळे रोजगार हिरावलेल्या, प्रचंड वीज बिलाच्या कचाट्यात सापडलेल्या नागरिकांना सरकारने दिलासा देत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी धोरणात्मक कणखरपणा दाखवण्याची गरज आहे.

Source link