विकासकामांना गती द्या; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

विकासकामांना गती द्या; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
- Advertisement -

परभणी, दि. २३ : सेलू व जिंतूर तालुक्यांतील विविध विकासकामांचा आज पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सविस्तर आढावा घेतला. नगर परिषद, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, जलसंधारण, उद्योग, ऊर्जा व सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेली तसेच प्रलंबित कामे यावर व्यापक चर्चा करताना, लोकहिताच्या कामांना विलंब होऊ देऊ नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिंतूर येथील बोर्डीकर–पोदार इंग्लिश स्कूल येथे आयोजित आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, जिंतूरचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सहायक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी सेलू व जिंतूर नगर परिषद क्षेत्रातील विविध नागरी समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी उपाययोजना, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व दीर्घकालीन नियोजन, घरकुल योजनांची अंमलबजावणी, नाट्यगृह व प्रशासकीय इमारतींची सद्यस्थिती, एसटीपी प्लांटची कार्यक्षमता, क्रीडांगणांची उभारणी व देखभाल, तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य वितरण यासंबंधी माहिती सादर करण्यात आली. यासोबतच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करण्याबाबतची कार्यवाही आणि एनएच-६१ (पारवा ते आसोला) या परभणी शहर बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.

महसूल विभागाच्या कामांवरही यावेळी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. दोन्ही तालुक्यांतील पाणंद व शेतरस्त्यांची स्थिती, महाराजस्व अभियानाची प्रगती, टंचाई परिस्थितीचा आढावा, संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित प्रकरणे तसेच मान्सूनपूर्व तयारी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ‘लाडकी बहीण’ व ‘लखपती दीदी’ योजनांच्या लाभार्थ्यांची स्थिती व अंमलबजावणीचा आढावा घेऊन योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला. याशिवाय जिंतूर येथील येलदरी धरणातून पाणी वितरण व्यवस्था, उद्योग क्षेत्राची सद्यस्थिती, महावितरणच्या सेवा तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, विकासकामे अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नयेत. कामांमध्ये अडथळे येत असल्यास ते तात्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणावेत व त्यावर त्वरित उपाययोजना करावी. पाणीपुरवठा व टंचाई व्यवस्थापनाला प्राधान्य देत मान्सूनपूर्व सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत व पारदर्शक पद्धतीने पोहोचवावा, तसेच भूसंपादन व अतिक्रमण विषयात नियमांचे काटेकोर पालन करावे.

तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून कामांना गती द्यावी, गुणवत्ता राखून कामे पूर्ण करावीत आणि नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. विकासकामांचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होत असतो. त्यामुळे प्रत्येक काम वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि जबाबदारीने पूर्ण झाले पाहिजे, असे स्पष्ट शब्दांत पालकमंत्र्यांनी सांगितले.

0000

- Advertisement -