ठाणे, दि. 5 (जिमाका): शहराचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या प्राचीन अशा टाऊन हॉलमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या कोकण विभागीय विकास प्रदर्शनाचा आज समारोप झाला. राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या कठीण कालखंडात केलेल्या लोकोपयोगी कामांची सचित्र मांडणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली . त्याला शहर आणि परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याठिकाणी ठेवण्यात आलेल्या अभिप्राय नोंदवहीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, माहिती व जनंसपर्क विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी यांच्यापासून ते सामान्य नागरिकांनी प्रदर्शनाविषयी भरभरून मत व्यक्त केले.
कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी टाऊन हॉलमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात डॉ. मुळे यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची या मोहिमेंतर्गत सचित्र प्रदर्शनाचे दि. 1 ते 5 मे 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. नूतनीकरण झालेल्या ठाण्यातील ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री श्री. शिंदे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करीत महाविकास आघाडी शासनाने गेल्या दोन वर्षात सामान्य नागरिकांसाठी घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांची माहिती मिळण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक तथा प्रधान सचिव दीपक कपूर यांनी देखील या प्रदर्शनाला मंगळवारी भेट दिली. टाऊन हॉल सारखी सुंदर, सांस्कृतिक वारशाने समृद्ध वास्तू विभागीय प्रदर्शनासाठी मिळाली याचे समाधान असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या विकास कामांची सचित्र माहिती तसेच कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांची माहिती देणारे स्वतंत्र पॅनलद्वारे माहिती देण्यात आली. या पॅनलच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांची ओळख होतानाच त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची ओळख झाली. अशा प्रकारचे प्रदर्शन सातत्याने आयोजित केले पाहिजेत अशा प्रतिक्रिया नागिराकांनी प्रदर्शनाच्या भेटी दरम्यान व्यक्त केल्या आहेत. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव, माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, विभागीय माहिती कार्यालयातील माहिती सहाय्यक प्रविण डोंगरदिवे, ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील कर्माचारी यांनी मेहनत घेतली.
0000000