Home अश्रेणीबद्ध विकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन

विकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी दुपारी 2ची डेडलाईन

पुणे : गेले तीन आठवडे वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी सिंहगडावर पर्यटकांनी तुडुंब गर्दी केल्याने आता विकेंडला सिंहगडावर जाण्यासाठी पाेलिसांकडून डेडलाईन घालण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी दुपारी दाेन नंतर सिंहगडावर कुठल्याही वाहनाला साेडण्यात येणार नाही असे हवेली पाेलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी देखील काल करण्यात आली. त्यामुळेे गेल्या शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर वाहतूक काेंडी झाली नाही. 

वर्षाविहारासाठी सिंहगड हे तरुणाईचं आवडतीचं ठिकाण आहे. पुणेकरांबराेबरच राज्यभरातून पर्यटक वर्षाविहारासाठी सिंहगडावर येत असतात. पुण्यात आयटीयन्सची संख्या अधिक असल्याने अनेकांचे विकेंड्स प्लॅन सिंहगडावर हाेत असतात. त्यामुळे गेले तीन आठवडे सिंहगडावर प्रचंड वाहतूक काेंडी झाली हाेती. पर्यटक घाट रस्त्यावर दाेन ते तीन तास अडकून पडले हाेते. त्यातच सिंहगडाच्या पायथ्याला खडकवासला धरण असल्याने येथील चाैपाटी देखील विकेंडला खचाखच भरलेली असते. त्यातच वाहनचालक कशाही पद्धतीने वाहने लावत असल्याने तसेच येथील रस्ता अरुंद असल्याने चाैपाटीवर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत हाेत्या. यावर उपाय म्हणून आता पाेलिसांकडून विकेंडला खडकवासला चाैपाटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सिंहगडावर दुपारी दाेन नंतर वाहने साेडण्यास मनाई करण्यात आली आहे.  या निर्णयाची अंमलबजावणी कालच्या रविवारी करण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून एरवी दाेन ते तीन तास वाहतूक काेंडीत अडकून पडणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक काेंडीतून काहीसा दिलासा मिळाला. परंतु दुपारी दाेन नंतर आलेल्या पर्यटकांची चांगलीच निराशा झाली. त्यांना आल्या पाऊली परतावे लागले. त्यामुळे अनेकांच्या विकेंड प्लॅनवर विरझन पडले. हा निर्णय कधीपर्यंत लागू असेल याबाबत स्पष्ट माहिती नसली तरी संपूर्ण मान्सून हा निर्णय लागू असणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.