विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी अभ्यासिका महत्त्वाची : राज्यमंत्री योगेश कदम

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी अभ्यासिका महत्त्वाची : राज्यमंत्री योगेश कदम
- Advertisement -


बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : देशाच्या विकासात तरुणांचा मोठा वाटा असून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आधुनिक सुविधा असलेल्या अभ्यासिका महत्त्वपूर्ण ठरतात. विद्यार्थ्यांनी अशा सुविधांचा लाभ घेऊन शिक्षण, स्पर्धा परीक्षा तसेच विविध क्षेत्रांत प्रगती साधत देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी केले.

मेहकर शहरातील शिवाजीनगर परिसरात सुमारे ६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत अभ्यासिकेचे लोकार्पण राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते आज करण्यात आले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही अभ्यासिका उभारण्यात आली आहे.

लोकार्पण समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, सिद्धार्थ खरात, मेहकर नगरपालिकेचे अध्यक्ष किशोर गारोळे, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, माजी आमदार संजय रायमुलकर, अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, ही अभ्यासिका स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा परीक्षांपुरते मर्यादित न राहता विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतही उत्साहाने सहभागी व्हावे. अभ्यासिकेमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध होणार आहे. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक वाचन सुविधा, संदर्भग्रंथ, डिजिटल साधने यांसह ऑडिओ लायब्ररीची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, मेहकर तालुक्यात विविध विकासकामे वेगाने सुरू असून त्यातून शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. आधुनिक अभ्यासिकेमुळे शहराच्या वैभवात भर पडली असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या अभ्यासिकेच्या माध्यमातून या भागातील तरुण उच्च पदांवर पोहोचतील आणि आपल्या शहराच्या तसेच देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभ्यासिकेसाठी पुस्तके, संगणक तसेच अन्य आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी सांगितले.

00000

 

 

 

 

 



Source link

- Advertisement -