Home ताज्या बातम्या विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाने काम करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाने काम करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाने काम करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.९ : प्रत्येक क्षेत्रात सराव आणि अभ्यासाने माणूस परिपूर्ण बनत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामाला कमी न लेखता आत्मविश्वासाने काम  करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

किवळे येथील सिम्बॉयसिस कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षण विद्यापीठाच्या तिसऱ्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. बी. मुजुमदार, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सचे अध्यक्ष राजेश खत्री, विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार आणि प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिउरकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, शासन कौशल्य विकासासाठी अनेक योजना राबवत आहे आणि त्यासाठी सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालय स्थापित करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत स्वावलंबी बनेल.

केवळ महत्वाकांक्षा बाळगून यशस्वी होता येत नाही तर श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने परिश्रम करण्याची गरज असते.  हे गुणच स्नातकांना यशाच्या शिखरावर पोहोचवतील. विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यापीठाचा लौकीक उंचावेल असे काम विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आजची पिढी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून कुलपती डॉ. मुजूमदार म्हणाले, तरुणांना पुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्य आवश्यक आहे  हे ओळखून सिम्बॉयसिस संस्थेने पहिले कौशल्य विकास विद्यापीठ सुरु केले.  या विद्यापीठातून बाहेर  पडणारा विद्यार्थी आत्मविश्वास सोबत घेवून यशस्वी उद्योजक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजेश खत्री यांनी फियाट- सिम्बॉयसिस या उपक्रमातील अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल  मुलींचे अभिनंदन केले. फियाट इंडिया आणि सिम्बॉयसिस विद्यापीठ यांच्यातील हा संयुक्त प्रकल्प आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींना उत्पादन  क्षेत्रात प्रशिक्षण घेण्याची संधी देतो, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठातील कौशल्ये आत्मसात करून यशस्वीपणे करियर सुरु करणाऱ्या स्वप्नील मखरे आणि स्वाती पांचाळ या  विद्यार्थ्यांना कुशल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समारंभाला विद्यापीठाचे प्राध्यापक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

000