विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार -पालकमंत्री रवींद्र चव्हाण
- Advertisement -

पालघर दि. ७ : आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती करता यावी यासाठी इंटरनेट, टॅब अशा विविध शैक्षणिक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत श्री. चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

जव्हार प्रकल्पांतर्गत ३० शासकीय व १८ अनुदानित शाळांमधून ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रकल्प कार्यालय सतत प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लासरूम, डिजिटल स्कूल, NEET ची पूर्वतयारी, बाला या संकल्पनेतून इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गांचे सुशोभीकरण व टॅब या योजना मंजूर झाल्या असल्याचे पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

स्मार्ट क्लासरूम, NEET बॅच व बाला या संकल्पने अंतर्गत वर्गाचे सुशोभीकरण या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. त्यांचा फायदा विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबींमध्ये होताना दिसून येत आहे. स्मार्ट क्लासरूमच्या माध्यमातून आपल्या अवघड संकल्पना समजून घेताना विद्यार्थी दिसतात तर बालांतर्गत सुशोभीकरण झालेल्या वर्गामधून विद्यार्थी आनंददायी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. असेहि पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

हस्ते जव्हार प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांना ६२५ टॅब वाटप

टॅबमुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे फायदे होणार असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना यूट्यूब वरील विविध लेक्चर अटेंड करता येतील. विविध विषयांचा प्री लोडेड अभ्यासक्रम अभ्यासण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे सध्याच्या डिजिटल युगामध्ये त्यांना शालेय वयामध्ये टॅब हाताळण्यास मिळणार असल्याने ते या स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांची पूर्वतयारी झालेली असेल. विविध ऑनलाईन परीक्षांसाठी सध्या संगणकीय प्रणालीचा वापर होतो. त्यामुळे विद्यार्थी गोंधळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण टॅबमुळे याचा सराव विद्यार्थ्यांना करता येईल.

नीट परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांना करता येईल. उपक्रमशील शिक्षकांनी तयार केलेले दर्जेदार विषयांशी संबंधित अशा घटकांवर बनवलेले व्हिडिओ बघून त्यांना त्यांच्या संकल्पना स्पष्ट करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून विविध परीक्षांचा ऑनलाईन सराव करण्याची संधी सुद्धा उपलब्ध होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. जव्हार तालुक्यातील न्याहाळे ब्रु. गावंडपाडा येथील स्ट्रॉबेरी शेतीला पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी भेट देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जव्हार प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह, तसेच वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

०००

- Advertisement -