
जे जे महानगर रक्तकेंद्राचे प्रमुख व वैद्यकीय सामाजिक अधिकारी यांच्या सेवा समाप्त – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर
मुंबई, दि. २९ जून : सर जे. जे. महानगर रक्तकेंद्रातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत उपसंचालक ठाणे मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून रक्तकेंद्राचे प्रमुख डॉ. हितेश पगारे, कंत्राटी वैद्यकीय संचालक व वैद्यकीय सामाजिक अधिकारी अजय भिसे यांची सेवा समाप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली.
विधान परिषदेत सदस्या चित्रा वाघ यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी चर्चेत ॲड मानसी नाईक, ॲड मनिषा कायंदे, प्रविण दरेकर, प्रज्ञा सातव, राजीव पोतदार, श्रीकांत भारतीय यांनी सहभाग घेतला, राज्य रक्त संक्रमण परिषद संचालित सर जे. जे. महानगर रक्तकेंद्राचे प्रमुख डॉ. हितेश पगारे हे कंत्राटी तत्वावर कार्यरत होते. मागील तीन वर्षातील विविध रक्तदान शिबिरामध्ये प्रत्यक्ष संकलित झालेल्या रक्तपिशव्यांची संख्या आणि सर जे. जे. महानगर रक्तकेंद्राच्या नोंदीमध्ये दर्शविलेल्या संख्येमध्ये मोठी तफावत व शासकीय रक्तसाठ्याचा गैरवापर, आर्थिक अनियमितता, रक्त पुरवठा व्यवस्थेतील त्रुटी आढळून आल्या आहेत.
सर जे.जे. महानगर रक्तकेंद्राच्या सरासरी वार्षिक रक्तसंकलन 22 ते 25 हजार युनिट एवढे आहे. तक्रारीच्या अनुषंगाने रक्त संकलनासाठी वापरण्यात आलेल्या रक्तपिशव्या, कन्झुमेबल्स व रक्तपिशव्या संकलित करण्यासाठी झालेला खर्च विचारात घेऊन शासकीय रक्तकेंद्रासाठी लागू असलेले प्रक्रिया शुल्क वसुल करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी करण्यात आली असता तपासणीमध्ये त्रुटी आढळून आल्या असून रक्तकेंद्र तात्पुरत्या स्वरुपात बंद केलेले आहे.
तसेच गीताई ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा संचलित माया रक्तकेंद्र, बदलापूर रक्तकेंद्राची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणीमध्ये गंभीर व मोठ्या त्रुटी आढळून आल्या रक्तकेंद्र देखील तात्पुरत्या स्वरुपात बंद केलेले आहे असे सांगितले.
00000
किरण वाघ/विसंअ
















WhatsApp