Home ताज्या बातम्या विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

0
विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे लवकरच भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. 22 : राज्यात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातील प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य नागोराव गाणार यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री. महाजन बोलत होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यानुसार सद्यस्थितीत भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु आहे. सर्व महाविद्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस कमिशन तयार करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करीत असल्याचेही श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.

००००

जिल्हापरिषदेतील केंद्रप्रमुखांच्या वेतन निश्चितीचे प्रकरण लवकरच मार्गी लावू – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. 22 : जिल्हा परिषदेमधील केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती व वेतन निश्चितीच्या प्रकरणाबाबत शिक्षण, वित्त व ग्रामविकास या विभागांमध्ये सुसूत्रता आणून या विभागाच्या समन्वयातून हा विषय तातडीने मार्गी लावू, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत सांगितले.

बुलढाणा जिल्हा परिषदेमधील केंद्रप्रमुख यांची पदोन्नती व वेतन निश्चितीची प्रकरणाच्या अनुषंगाने डॉ.रणजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.महाजन बोलत होते.

ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षकांच्या, केंद्रप्रमुखांच्या असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील. जिल्हा परिषद ही कार्यान्वयीन यंत्रणा असल्यामुळे शालेय शिक्षण विभाग याबाबत धोरण निश्चित करत असते. हे लक्षात घेऊन वित्त, शालेय शिक्षण आणि ग्रामविकास विभाग यांची एकत्रितपणे बैठक घेऊन सर्व जिल्ह्यांसाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यात येईल. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता व सुसूत्रता आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. महाजन यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री विक्रम काळे, राम शिंदे, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

000000

सर्व खासगी आस्थापनांना राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 22 : शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येईल. तसेच सर्व खासगी आस्थापनाना त्यांची मनुष्यबळ मागणी राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग व कामगार विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत पुढील कर्यवाही केली जाईल, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.

शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळण्याबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याविषयी माहिती देताना श्री. लोढा बोलत होते.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले, रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत कंपनीने रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक राहील. यासाठी विभागाच्यावतीने पोर्टल विकसित करण्यात आले असून या पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांची नोंदणी वाढली पाहिजे, तसेच या विभागाच्या वतीने बेरोजगार उमेदवारांना नोकरी तसेच चांगल्या सुविधा कशा प्रकारे देता येतील यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नाच्या वेळी सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सचिन अहिर, प्रवीण दरेकर, डॉ. रणजित पाटील, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.

००००

सर्व बांधकाम मजुरांना येत्या २ महिन्यात सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करणार – कामगार मंत्री सुरेश खाडे

मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणी झालेल्या व नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व बांधकाम मजुरांना येत्या 2 महिन्यात सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात येईल. तसेच संच वाटपाची विभागामार्फत पडताळणी करण्यात येईल. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत दिली.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम मजुरांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप करण्याबाबत प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना कामगार मंत्री श्री. खाडे बोलत होते.

कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले, इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम अन्वये कामगारांची मंडळांमध्ये नोंदणी करताना मागील वर्षभरात किमान 90 दिवस बांधकामावर काम करणे अनिवार्य आहे. तसेच अधिनियमाच्या कलम 11 नुसार मंडळाअंतर्गत नोंदीत बांधकाम कामगार मंडळाच्या योजनेच्या लाभास पात्र आहे.

त्यानुसार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावशक संच वितरित करण्यात येतील. राज्यात 5 लाख 83 हजार 668 इतक्या संच वाटपास मान्यता देण्यात आली असल्याचेही  कामगार मंत्री श्री.खाडे यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नाच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, सचिन अहिर, प्रवीण दरेकर, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

0000