Home बातम्या ऐतिहासिक विधानपरिषद प्रश्नोत्तरे

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
विधानपरिषद प्रश्नोत्तरे

नागपूर विद्यापीठाचे निकाल घोषित करण्याची प्रक्रिया वेळेत – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 25 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे निकालाच्या पद्धतीत बदल झाले आहेत. त्याप्रमाणे निकाल देण्याची पद्धती बदलली आहे. नागपूर विद्यापीठाची शिल्लक असलेल्या नऊ परीक्षांचे निकाल घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांचे निकाल घोषित करण्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, निकाल प्रलंबित का राहिले याबाबत लोकप्रतिनिधी, कुलगुरु यांच्यासमवेत बैठक घेऊन माहिती घेण्यात येईल. सर्व बाबी तपासून दोषींवर कारवाई केली जाईल. सध्या १५० परीक्षांपैकी केवळ ९ परीक्षांचे निकाल घोषित करण्याचे प्रयत्न सुरू असून उर्वरित सर्व परीक्षांचे निकाल वेळेत घोषित करण्यात आले आहेत.

विद्यापीठाचे वाशिम येथे नव्याने उपकेंद्र सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्या दृष्टीने एक समिती गठित करण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत  सदस्य प्रवीण दरेकर, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.