शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक – मंत्री छगन भुजबळ
- बंद केंद्रे लवकरच सुरू करणार
मुंबई, दि. 23 : शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील विशेषतः पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत विधानपरिषद सदस्या उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिले असून राज्यातील ४२ पैकी ४१ शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या, ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे; तसेच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे, तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरगुती गॅस पुरवठ्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर व्यावसायिक ग्राहकांना पुरवठा केला जात आहे. राज्यातील सर्व शिवभोजन केंद्रांचा कारभार सुरळीत सुरू राहावा यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे; तसेच लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, असेही मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.
0000
मोहिनी राणे/ स.सं.
उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
- जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार
मुंबई, दि. 23 : उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार आहे; तसेच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
उरण (जि. रायगड) येथील भारत मुंबई कंटेनर टर्मिनलला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत विधानपरिषद सदस्य अभिजात वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री भोसले म्हणाले की, संबंधित पुलामध्ये कोणतीही संरचनात्मक त्रुटी आढळलेली नाही. पुलालगतच्या भरावाचा काही भाग खालच्या मातीच्या थरात झालेल्या नैसर्गिक स्थिरीकरणामुळे (सेटलिंग); तसेच काही प्रमाणात अतिवजनाच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे खचला असण्याची शक्यता आहे. मात्र, पुलाच्या सुरक्षिततेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो संबंधित ठेकेदाराकडून देखभाल करारातील (मेंटेनन्स क्लॉज) तरतुदीनुसार करण्यात येत आहे. भरावाची दुरुस्ती; तसेच आवश्यक काँक्रीटीकरणाचे काम जुलै 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री भोसले यांनी सांगितले की, आयआरसीच्या निकषांनुसार राष्ट्रीय महामार्गांवरील पुलांचे आणि भरावांचे डिझाईन तयार केले जाते. अशा प्रकारच्या काही बाबी विविध ठिकाणी निदर्शनास आल्यानंतर संबंधित डिझाईनमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. नव्या डिझाईननुसार कामे करण्यात येत असून भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होणार आहे.
या कामासाठी कोणताही अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला नसून संबंधित एजन्सीवरच दहा वर्षांच्या देखभालीची जबाबदारी आहे. त्यामुळे पुढील कालावधीतही पुलाची देखभाल आणि आवश्यक दुरुस्तीची कामे संबंधित एजन्सीकडूनच करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी जबाबदार अधिकारी अथवा संबंधित बाबींची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले.
0000
मोहिनी राणे/ स.सं.






















WhatsApp