Home ताज्या बातम्या विधानपरिषद लक्षवेधी  – महासंवाद

विधानपरिषद लक्षवेधी  – महासंवाद

0
विधानपरिषद लक्षवेधी  – महासंवाद

मुंबई, दि. 19 : राज्यात एसटी बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी एसटीमार्फत चालक-वाहकांना प्रशिक्षण तसेच वाहनांमधील तांत्रिक दोष दूर करण्यावर भर दिला जात असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.

शिवशाही बसला आग लागण्याच्या आणि अपघात होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. भुसे यांनी ही माहिती दिली.

मंत्री श्री.भुसे म्हणाले की, प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी 2017-18 मध्ये शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली. सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्य परिवहन स्व-मालकीच्या शिवशाही बसचे 245 अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसचे 60 असे एकूण 305 अपघात झाले आहेत. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सन 2023-24 मध्ये मे 2023 अखेर स्वमालकीच्या शिवशाही बसचे 47 अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसचे चार असे एकूण 51 अपघात झाले असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्वमालकीच्या शिवशाही बसवरील चालकांना शिवशाही बस चालविण्याचे पूर्व प्रशिक्षण दिल्याशिवाय शिवशाही नियतावर कामगिरी देण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत. रा.प. बस चालकांना शिवशाही बसचे प्रशिक्षण देण्यासाठी रा.प. मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी येथे रा.प. महामंडळातील सुमारे 100 वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) यांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक विभागातील चार प्रशिक्षित चालकांमार्फत सर्व विभागातील चालकांना नियमितपणे आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना नियमितपणे करण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा आतापर्यंत 12 कोटी 89 लाखांहून प्रवाशांनी लाभ घेतला असून यासाठी एसटीला 662 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत योजनेचा 17 कोटी 42 लाखांहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला असून यासाठी 505 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली. चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना आरोग्य तपासणीसाठी तीन हजार रुपये, वेतन व भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. 500 हून अधिक बसस्थानकांचे सुशोभीकरण, स्वच्छता, बांधणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या ताफ्यात नवीन ई-बस घेण्यात येणार आहेत. तथापि, त्यांचा सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी जेथे आवश्यकता आहे तेथे बससेवा सुरू करण्यात येईल, असे सांगून नाशिक येथील महानगरपालिकेची सध्या बंद असलेली बससेवा तातडीने सुरू होण्याबाबत आजच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नासंदर्भात बोलताना सांगितले.

या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, किशोर दराडे, प्रवीण दरेकर, नरेंद्र दराडे, ॲड. अनिल परब, कपिल पाटील, शशिकांत शिंदे, श्रीमती उमा खापरे आदींनी सहभाग घेतला.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/