
पुणे परिसरातील मेट्रो, रस्ते, पाणीपुरवठा व नदी शुद्धीकरण प्रकल्पांना गती – मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई, दि. 16 : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, पाणीपुरवठा आणि नदी शुद्धीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे आणि सचिन अहिर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला असून पिंपरी-चिंचवड ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. हे काम जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.
शिवाजीनगर ते हिंजवडी (माण) या मेट्रो लाईन-३ प्रकल्पाची लांबी 23.20 किमी असून त्यात 23 स्थानके आहेत आणि या प्रकल्पाचे सुमारे 94 टक्के काम पूर्ण झाले आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र प्रकल्प पीपीपी मॉडेलवर उभारला जात असून त्याचा करारही पूर्ण झाला आहे. याशिवाय 55 रस्ते विकास कामांसाठी निविदा काढण्यात आल्या असून निधीअभावी ही कामे थांबणार नाहीत. मावळ तालुक्यातील पाच आणि मुळशी तालुक्यातील चार रस्ते विकास कामेही लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत बोलताना मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, औद्योगिक, व्यावसायिक तसेच इतर सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली असून तिच्या शुद्धीकरणासाठी केंद्र शासनाने सुमारे 1,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तसेच पवना नदी शुद्धीकरणासाठी एमएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून काम केले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पवना प्रकल्पातून 520 एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पातून 100 एमएलडी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच आसखेड प्रकल्पातील जॅकवेल, शुद्धीकरण केंद्र आणि पाइपलाइनची कामे प्रगतिपथावर असून नवीन ठेकेदारामार्फत पुढील 10 ते 12 महिन्यांत 167 एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
००००
राजू धोत्रे/वि.सं.अ
पुणे परिसरातील नगररचना योजनांबाबत लवकरच निर्णय – मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई, दि. १६ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील वडाचीवाडी, औताडे हांडेवाडी, परिसरातील नगररचना योजनांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य योगेश टिळेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री डॉ. सामंत
बोलत होते.
मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, योजना क्रमांक २, ३, ४ व ५ या चार नगररचना योजनांमध्ये एकूण सुमारे ५१८.२ हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. या योजनांसाठी लवादांची नियुक्ती अनुक्रमे २३ डिसेंबर २०२१ व २० सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आली आहे. या योजनांमुळे भविष्यातील विकासाला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसमवेत तातडीने बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
फुरसुंगी नगरपंचायत व परिसरातील टीपीएस योजना राबविण्याबाबत कायदेशीर बाबींची पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. यासंदर्भातील अहवाल ३ फेब्रुवारी २०२६ रोजी शासनाला सादर करण्यात आला असून, पुढील निर्णय लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
००००
राजू धोत्रे/वि.सं.अ
पीएफएएस रसायन उत्पादन प्रकरणाची आयसीटीकडून चौकशी – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. १६ : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पीएफएएस प्रकारातील रसायनांच्या उत्पादनाबाबत आणि संभाव्य पर्यावरणीय परिणामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) यांच्याकडून वैज्ञानिक तपासणी करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री मुंडे बोलत होत्या.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, लोटे औद्योगिक वसाहतीमधील मे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज या उद्योग घटकास दरवर्षी ८,५०० मेट्रिक टन ‘स्पेशालिटी इंटरमीडिएट्स’ उत्पादनासाठी पर्यावरणीय अनुमती देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक संमतीपत्र देखील देण्यात आले आहे. पुढे ही पर्यावरणीय अनुमती मे. येलोस्टोन फाईन केमिकल्स प्रा. लि. या कंपनीच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली असून त्या नावाने उत्पादन सुरू करण्यासाठी संमती देण्यात आली आहे. या संमतीपत्राची वैधता ३० जून २०२६ पर्यंत आहे.
दरम्यान, पीएफएएस प्रकारातील रसायनांच्या उत्पादनासंदर्भात प्राथमिक तपासणी करण्यासाठी सात सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांकडून आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाचा अधिक सखोल व वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी आयसीटीकडे स्वतंत्र चौकशी सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री मुंडे यांनी सांगितले केले की, पीएफएएस प्रकारातील ठराविक पर्यावरणीय नियम व निकषांचे पालन करूनच त्यांचे उत्पादन करण्यास परवानगी दिली जाते. संबंधित कंपनीने सध्या हे उत्पादन बंद केले असून सांडपाणी व्यवस्थापन आणि त्याच्या विल्हेवाटीबाबत पर्यावरणीय नियमांचे पालन झाले आहे का, याचीही तपासणी केली जात आहे.
या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे, शशिकांत शिंदे, सदाभाऊ खोत आणि मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
००००
राजू धोत्रे/वि.सं.अ
सुवर्णकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक कार्यपद्धती तयार करणार – गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि. १६ : सुवर्णकारांच्या विविध समस्यांबाबत लवकरच संबंधित बँकिंग संस्था व सुवर्णकार संघटनांची बैठक घेऊन मार्गदर्शक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्या बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, राज्यातील विविध राष्ट्रीय, खासगी, ग्रामीण तसेच सहकारी बँकांमार्फत सोन्यावर कर्ज दिले जात असल्याने या संदर्भात सर्व संबंधितांची अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्याच्या आत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी गोल्ड व्हॅल्यूअरची नियुक्ती केली जाते. मात्र त्यांच्या मानधनाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेक सुवर्णकारांना अडचणी येत असल्याने सुवर्णकारांच्या सुरक्षिततेसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समित्या जिल्हास्तरावरही समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या माध्यमातून बँकर्स असोसिएशन तसेच सुवर्णकार संघटनांचा समन्वय साधून गोल्ड व्हॅल्यूअर नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांन सहभागी घेतला.
००००
राजू धोत्रे/वि.सं.अ
कोरेगाव पोलीस ठाण्यातील कारभाराबाबत चौकशी सुरू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि. १६ : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विविध तक्रारी संदर्भात शासनाने चौकशी सुरू केली असून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, महासंचालकांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून दारूबंदीचे ५३ आणि जुगाराचे ५१ गुन्हे नोंदविण्यात आल्याचे अहवालात नमूद असल्याचे त्यांनी सांगितले.
सदस्य शशीकांत शिंदे यांनी दिलेल्या पेन ड्राईव्हमधील माहितीच्या आधारे स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली असून त्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही त्यांनी त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सदस्य भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला.
००००
राजू धोत्रे/वि.सं.अ






















WhatsApp