Home ताज्या बातम्या विधानपरिषद लक्षवेधी

विधानपरिषद लक्षवेधी

0
विधानपरिषद लक्षवेधी

पंढरपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या वाढीव १० एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पांस लवकरच तांत्रिक मान्यता मंत्री शंभूराज देसाई

प्रकल्पांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

मुंबई, दि. 24 : नमामी चंद्रभागा प्रकल्पाअंतर्गत पंढरपूर शहरातील सांडपाण्यावर दैनंदिन प्रक्रिया करणारा 15 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प वाढत्या लोकसंख्येला अपुरा ठरत असल्याने वाढीव 10 एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाचा नवीन प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्याची मंजुरी लवकरात लवकर देण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून प्रकल्पासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरला गेले असताना या वाढीव सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार यासाठी 103 कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक मान्यतेकरिता हा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. तांत्रिक मान्यता लवकरात लवकर देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. या प्रकल्पाला शासनाने प्रथम प्राधान्य दिले असून लवकरात लवकर तांत्रिक मान्यतेसह प्रस्ताव  नगरविकास  विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर  यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे तातडीने  हा विषय मार्गी लावण्यात येईल.

पंढरपूर येथील रहिवासी आणि  येणाऱ्या भाविकांना चांगले पाणी मिळाले पाहिजे यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या जातील.

शून्य डिस्चार्जच्या अनुषंगाने तांत्रिक मान्यता मिळाल्यावर तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर यंत्रणेला सूचना दिल्या जातील. तसेच हा सांडपाणी प्रकल्प करीत असतांना शेजारील दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या गावांचाही यामध्ये अंतर्भाव केला जाईल, असेही देसाई यांनी सांगितले.

पंढरपूरची वाढती लोकसंख्या तसेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील सांडपाण्यावर दैनंदिन प्रक्रिया करणारा 15 एम एल डी क्षमतेचा प्रकल्प वाढत्या लोकसंख्येला अपुरा ठरत असल्याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मांडली होती. या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते. सदस्य जयंत पाटील यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.

000000

मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 24 : मत्स्य व्यवसायासाठी राज्यामध्ये ज्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तातडीने, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील. यासाठी केंद्रीय मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सदस्य भाई गिरकर, प्रसाद लाड यांनी मत्स्यव्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने शासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री. मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

राज्‍यातील मच्‍छीमार, मत्‍स्‍यसंवर्धक व मत्‍स्‍यव्‍यवसाय सहकारी संस्‍थांना क्षमतेनुसार मासेमारी करता न आल्‍याने सन २०२१-२२ या वर्षाची तलाव ठेका रक्‍कम भरण्‍यास मुदतवाढ देण्‍याचा निर्णय घेतला असल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्‍यात १३७३ मच्‍छीमार सहकारी संस्‍था तसेच ४२० खाजगी ठेकेदार आहेत. राज्‍यातील मासेमारीकरिता ठेक्‍याने देण्‍यात आलेल्‍या तलाव तसेच जलाशयांची सन २०२१-२२ ची वार्षिक तलाव ठेका रक्‍कमेचा भरणा करण्‍यास दिनांक ३१ जुलै २०२२ पासून पुढे २०२१ – २२ ची तलाव ठेका माफी प्रस्‍ताव मंत्री मंडळासमोर सादर होईपर्यंत मुदतवाढ देण्‍याचे निर्देशही विभागाला दिले आहेत, असेही मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

भविष्याचा वेध घेता परकीय चलन मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. कृषी क्षेत्राप्रमाणे या क्षेत्राला सुविधा देण्यासाठी साकल्याने विचार करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

0000