मुंबई, दि. १५ : जपानचे भारतातील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी आज विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सभापती पदी निवड झाल्याबद्दल श्री.कोजी यांनी प्रा.शिंदे यांचे अभिनंदन केले.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी महावाणिज्यदूत श्री. कोजी यांचे स्वागत केले. यावेळी विधिमंडळाचे सचिव (कार्यभार २) विलास आठवले उपस्थित होते.
जपान भारत यांचे मैत्रीचे संबंध आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यामध्ये विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये जपान सहभागी असल्याचा आपल्याला आनंद आणि अभिमान असल्याचे श्री. कोजी यांनी यावेळी सांगितले. तसेच मेट्रोच्या उभारणीत जपान संपूर्ण सहकार्य करीत असून लवकरच ते काम पूर्णत्वास येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा. शिंदे यांनी पर्यटन मंत्री असताना एप्रिल २०१६ मध्ये दिलेल्या जपान भेटींना उजाळा दिला. त्यावेळी प्रा.शिंदे यांनी याकोहामा मधील कोयासान विद्यापीठात दिलेल्या भाषणांची आठवण सांगितली. तसेच जपानच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला.
००००